रविवार २ नोव्हेंबर २०२५ ची रात्र भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात दीर्घकाळ स्मरणात राहील. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात द. आफ्रिकेचा पराभव करून आपले पहिलेवहिले विश्वविजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यातील शफाली वर्माची धडाकेबाज खेळी असो किंवा संपूर्ण स्पर्धेत दीप्ती शर्माने केलेली अष्टपैलू कामगिरी असो, या ऐतिहासिक कामगिरीला कारणीभूत ठरलेल्या सर्व योगदानांबद्दल चाहते आणि क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. मात्र, या गौरवशाली क्षणांमध्ये काही असे महत्त्वाचे क्षण आहेत, जे दुर्लक्षित राहिले. पण ते भारताच्या विश्वचषक विजयासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. या स्पर्धेतील अशाच पाच महत्त्वाच्या क्षणांवर एक नजर टाकूया.
स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. १२० धावांवर २ गडी गमावल्यानंतर, इनोका राणावीराच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेने मधल्या फळीत मोठे खिंडार पाडले. भारताने अवघ्या सहा धावांत चार महत्त्वाचे बळी गमावले होते.
या कठीण परिस्थितीत अमनजोत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी भागीदारी रचली. अमनजोतने ५६ चेंडूंमध्ये ५७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली, तर दुसऱ्या बाजूने दीप्ती शर्माने ५३ चेंडूंमध्ये ५३ धावा करत एक बाजू सांभाळली. त्यांच्या १०३ धावांच्या भागीदारीमुळे भारताने २०० धावांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर स्नेह राणाने १५ चेंडूंमध्ये २८ धावांची आकर्षक 'कॅमिओ' खेळी केली. याच्या जोरावर भारताची धावसंख्या ८ बाद २६९ पर्यंत पोहचली, जी श्रीलंकेसाठी खूप मोठी ठरली. डक्सवर्थ-लुईस पद्धतीनुसार भारताने हा सामना ५९ धावांनी जिंकला आणि आपल्या मोहिमेतील पहिले गुण मिळवले.
पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने २४७ धावा केल्या होत्या. हे आव्हान मध्यम स्वरूपाचे होते आणि जर पाकिस्तानच्या सलामीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली असती, तर त्यांना लक्ष्य गाठण्याची आशा होती.
मात्र, त्या रात्री क्रांती गौड तिच्या सर्वोत्तम गोलंदाजीच्या फॉर्ममध्ये होती. तिने सलामीवीर सदाफ शमास हिला लवकर बाद करून प्रतिस्पर्धी संघाला पहिला धक्का दिला. यानंतर, पाक संघाला आशा होती की आलिया रियाझ ही सिद्रा अमीनसोबत भागीदारी करून डाव सावरणार. पण गौडने रियाझला देखील फार काळ खेळू दिले नाही.
पाकिस्तानला हवी असलेली भागीदारी अखेरीस सिद्रा अमीन आणि नतालिया परवेझ यांच्यात झाली. या जोडीने ६९ धावा जोडल्या. दोघींनी पाकिस्तानला लक्ष्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. पण गौडने परवेझचा बळी घेऊन ही विकसित होत असलेली भागीदारी तोडली. यामुळे पाकिस्तानच्या धावगतीला खीळ बसली आणि सामना त्यांच्या हातून निसटला.
चांगल्या सलामी भागीदारीनंतर भारतीय फलंदाजी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर गडबडली. नदिन डी क्लर्क, नॉनकुलुलेको म्लाबा आणि चोले ट्रायॉन यांनी नियमित अंतराने बळी मिळवले. यामुळे भारताची स्थिती ७ बाद १५३ धावा अशी बिकट झाली.
यावेळी रिचा घोष आणि स्नेह राणा यांनी ८८ धावांची अत्यंत महत्त्वाची भागीदारी रचली. घोषची ९४ धावांची खेळी अविस्मरणीय होती. या भागीदारीमुळे भारताने २५१ धावांपर्यंत मजल मारली. पण रिचाची ही खेळी व्यर्थ ठरली आणि भारताला हा सामना गमवावा लागला. असे असले तरी रिचा आणि स्नेह यांच्यातील ही भागीदारी भारतीय संघातील संघर्ष वृत्ती आणि दबावाखाली कामगिरी करण्याची क्षमता दर्शवणारी ठरली.
सलामीवीर फोबी लिचफिल्डच्या शानदार शतकानंतर आणि ॲश्ले गार्डनरच्या आक्रमक अर्धशतकानंतर ऑस्ट्रेलिया ३५० हून अधिक धावसंख्या उभारणार असे वाटत होते. पण भारतीय गोलंदाजांनी, विशेषत: श्री चरणी, राधा यादव आणि दीप्ती शर्मा यांनी भारताला सामन्यातून पूर्णपणे बॅकफुटवर जाण्यापासून रोखले. डेथ ओव्हर्समधील नियंत्रित गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ ३३८ धावांपर्यंत मर्यादित राहिला. नंतर जेमिमाह रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौरच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने हे लक्ष्य यशस्वीरित्या गाठले.
अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २९८ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना द. आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डवर हिच्यावर मोठी जबाबदारी होती. तिनेही कंबर कसली आणि इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील चमकदार कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास मैदानात उतरली. तिने तशीच कामगिरी केली. वोल्वार्ड ही भारत आणि विश्वचषक ट्रॉफी यांच्यात अंतिम अडथळा बनून उभी राहिली.
पण, ४२ व्या षटकात दीप्ती शर्माने वोल्वार्डच्या खेळीतील एकमेव चुकीचा फटका मारण्यास तिला प्रवृत्त केले. हा फटकावलेला चेंडू डीप मिड-विकेट क्षेत्राकडे हवेत उंच गेला. तिथे क्षेत्ररक्षणासाठी असलेल्या अमनजोत कौरने धावत येऊन झेप घेतली आणि झेल घेतला. झेल घेत असताना चेंडू अमनजोतच्या हातून एक-दोन वेळा सुटला, पण अखेरीस तिने तो जमीनीवर पडताना सुरक्षितपणे उजव्या हातात पकडला. यासह वोल्वार्डच्या शतकी खेळीचा अंत झाला. कर्णधार बाद झाल्यामुळे द. आफ्रिकेचा उरलेला प्रतिकार फिका पडला. या विकेटसह भारताने आपले पहिले विजेतेपद निश्चित केले.
अमनजोत कौरने घेतलेला हा निर्णायक झेल, भारतीय संघाच्या संपूर्ण विश्वचषक प्रवासाचे एक अचूक प्रतिबिंब होते. सामन्यादरम्यान काही क्षणी चुका झाल्या, तर काही वेळा हातातून विजय निसटतोय की काय अशी भीतीही वाटली, पण अखेर जिद्दीच्या बळावर आणि संघभावनेच्या बळावर भारताने आपले अपेक्षित ध्येय साध्य केले आणि इतिहास रचला.