मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) विजयाचे श्रेय थेट माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना दिले आहे. मुंबईत झालेल्या सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार सोहळ्यादरम्यान बोलताना रोहितने हा महत्त्वाचा खुलासा केला. विशेष म्हणजे, भारताने ही ट्रॉफी जिंकली तेव्हा संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर कार्यरत होते, तरीही रोहितने द्रविड यांच्या कार्यकाळात रुजलेल्या प्रक्रिया आणि शिस्तीला यशाचे मूळ कारण मानले आहे. रोहितच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
रोहित शर्माने स्पष्ट केले की, भारतीय संघाला मिळालेले यश हे एक-दोन वर्षांचे काम नसून, अनेक वर्षांच्या अथक परिश्रमाचे आणि योग्य प्रक्रियेचे फलित आहे. द्रविड यांचे मार्गदर्शन आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवातून सावरत २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि त्यानंतर २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. ‘मला तो संघ खूप आवडतो आणि त्यांच्यासोबत खेळायलाही खूप आनंद वाटतो. आम्ही सर्वजण या प्रवासात अनेक वर्षांपासून एकत्र आहोत. हे काम एक-दोन वर्षांचे नव्हते, तर अनेक वर्षांपासून अव्याहतपणे सुरू होते,’ असे रोहितने यावेळी सांगितले.
यावेळी रोहितने संघातील प्रत्येक खेळाडूच्या मानसिकतेवर आणि भूमिकेवर भर दिला. त्याने सांगितले की, अनेकदा आम्ही ट्रॉफी जिंकण्याच्या अगदी जवळ पोहोचलो, पण यश मिळाले नाही. तेव्हाच सर्वांनी ठरवले की काहीतरी वेगळे करण्याची गरज आहे. ‘एक किंवा दोन खेळाडूंमुळे यश मिळत नाही. आम्हाला हे निश्चित करायचे होते की प्रत्येक खेळाडूने ही सकारात्मक विचारसरणी आत्मसात करावी,’ असे रोहित म्हणाला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अनुभव सांगताना तो म्हणाला, ‘या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूने सामना कसा जिंकायचा, स्वतःला आव्हान कसे द्यायचे आणि आत्मसंतुष्ट न होता कोणत्याही गोष्टीला हलक्यात घ्यायचे नाही, यावर लक्ष केंद्रित केले.’
रोहितने स्पष्टपणे सांगितले की, यशाचा पाया द्रविड यांनीच रचला होता. ‘जेव्हा आम्ही टी-20 विश्वचषकाची तयारी करत होतो, तेव्हा मला आणि राहुल भाईंना त्यांनी सुरू केलेल्या प्रक्रियेची खूप मदत मिळाली. तीच शिस्त आणि प्रक्रिया आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही कायम ठेवली.’ यातून रोहितने हे सिद्ध केले की, प्रशिक्षक बदलले असले तरी, द्रविड यांनी संघात रुजलेली कठोर मेहनत आणि शिस्तच मोठ्या स्पर्धांमध्ये निर्णायक ठरली. द्रविड यांनी तयार केलेला भक्कम पायाच गंभीर यांच्या मार्गदर्शनाखालील संघाच्या विजयाचे खरे कारण ठरले, हे कर्णधाराच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे.
यादरम्यान रोहित शर्माने आपल्या भविष्यातील योजनांवरही भाष्य केले. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय एकदिवसीय (ODI) संघाची कमान शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. रोहित म्हणाला, ‘मला जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा मी तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे मला खूप आवडते. तेथे क्रिकेट खेळणे खूप आव्हानपूर्ण असते. तिथे खेळण्याचा भरपूर अनुभव असल्यामुळे कसे खेळायचे, हे मला माहीत आहे.’ कर्णधाराच्या या खुलाशाने सध्या क्रिकेट विश्वाचे लक्ष केवळ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यशावर नसून, संघाच्या भावी वाटचालीवरही वेधले आहे.