टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याचा सलामी साथीदार यशस्वी जैस्वाल यांनी बांगलादेश विरुद्धच्या कानपूर कसोटीत विक्रम रचला. 
स्पोर्ट्स

रोहित-यशस्वीची टेस्टमध्ये ‘T20’ची खेळी! ठोकली कसोटीतील सर्वात वेगवान फिफ्टी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Yashasvi Jaiswal Record : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याचा सलामी साथीदार यशस्वी जैस्वाल यांनी बांगलादेश विरुद्धच्या कानपूर कसोटीत विक्रम रचला. या जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये टी-20 प्रमाणे वादळी खेळी करून चाहत्यांचे मनोरंजन केले. ग्रीन पार्क स्टेडियमवर दोघांनी मिळून अवघ्या तीन षटकांत 50 धावांचा टप्पा पार केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात जलद अर्धशतक ठरले आहे. भारताने या बाबतीत इंग्लंडचा विश्वविक्रम मोडीत काढला. या वर्षीच ट्रेंट ब्रिज कसोटीत इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध 4.2 षटकांत 50 धावा फटकावल्या होत्या.

कानपूर कसोटीचा दुसरा आणि तिसरा दिवस वाया गेल्यानंतर आज सोमवारी (दि. 30) सामन्याच्या चौथ्या दिवशी खेळ पुन्हा सुरू झाला. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला आणि बांगलादेशला 233 धावांत गुंडाळले. त्यानंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारतीय संघासाठी सलामी दिली. मैदानात उतरताच या जोडीने बांगलादेशी गोलंदावर आक्रमण केले. त्यांनी टी-20ला साजेशी अशी फलंदाजी करून धावा लुटल्या.

जैस्वालने भारतीय डावाच्या पहिल्याच षटकात हसन महमूलला 3 चौकार लगावले. त्यानंतर दुसरे षटक घेऊन आलेल्या खलीलची भारतीय कर्णधार रोहित शर्माने धुलाई केली. खलीलच्या या षटकात सलग दोन षटकार मारून रोहितने आपले इरादे स्पष्ट केले होते. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर जैस्वालने चौकार मारून संघाची धावसंख्या 2 षटकांत 29 धावांपर्यंत वाढवली. यानंतर तिसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या हसन महमूदचा दोन्ही फलंदाजांनी समाचार घेतला. या षटकात भारतीय फलंदाजांनी 2 षटकार आणि 2 चौकारांसह कसोटी इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान, यशस्वीने 13 चेंडूत 30 तर रोहितने 6 चेंडूत 19 धावा फटकावल्या. मात्र, पुढच्याच षटकात ही जोडी फुटली. 11 चेंडूत 23 धावा काढून रोहित बाद झाला. मेहंदी हसन मिराझने त्याची विकेट घेतली.

कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाकडून सर्वात जलद पन्नास धावा करण्याच्या बाबतीत इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे. 1994 मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4.3 षटकात 50 धावा ठोकल्या होत्या. चौथ्या क्रमांकावरही इंग्लंडचे नाव आहे. 2002 मध्ये इंग्लिश संघाने श्रीलंकेविरुद्ध 5 षटकांत 50 धावा केल्या होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT