स्पोर्ट्स

Team India Record : १७ षटकार, २५६ धावा! भारताची झिम्बाब्वेविरुद्ध 'पॉवर-पॅक' बॅटिंग; विश्वचषकातील दुसरा सर्वोच्च स्कोअर

IND vs ZIM T20 World Cup : भारताने विश्वचषकातील अनेक जुने विक्रम मोडीत काढले

रणजित गायकवाड

चेन्नई : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीत भारतीय फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा अक्षरशः पालापाचोळा केला. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत भारताने २० षटकांत ४ बाद २५६ धावांचा डोंगर उभा केला. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या: भारत दुसऱ्या स्थानी

आजच्या या झंझावातामुळे भारताने विश्वचषकातील अनेक जुने विक्रम मोडीत काढले आहेत.

  • २६०/६ : श्रीलंका वि. केनिया (जोहान्सबर्ग, २००७)

  • २५६/४ : भारत वि. झिम्बाब्वे (चेन्नई, २०२६) *

  • २५४/६ : वेस्ट इंडिज वि. झिम्बाब्वे (वानखेडे, २०२६)

सुरुवातीपासूनच झिम्बाब्वे 'बॅकफूट'वर

टॉस जिंकून झिम्बाब्वेचा कर्णधार सिकांदर रझाने खेळपट्टीवरील ओलाव्याचा फायदा घेण्याच्या आशेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय त्यांच्या अंगाशी आला. संजू सॅमसनला सलामीला पाठवण्याच्या भारताच्या रणनीतीमुळे झिम्बाब्वेला नवीन चेंडूवर ऑफ-स्पिनर वापरता आला नाही. संजूने २५ धावा करत भारताला वेगवान सुरुवात करून दिली आणि त्यानंतर भारतीय फलंदाजांनी मागे वळून पाहिलेच नाही.

'विराट' विक्रम

षटकारांचा नवा विक्रम : भारताने या डावात एकूण १७ षटकार ठोकले. टी-२० विश्वचषकाच्या एका डावात भारताने मारलेले हे सर्वाधिक षटकार आहेत. तसेच, या स्पर्धेत भारताच्या एकूण षटकारांची संख्या ६३ वर पोहोचली आहे.

  • स्ट्राइक रेटचा धमाका : भारताच्या पहिल्या ६ फलंदाजांपैकी प्रत्येकाने १५० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या. विश्वचषकाच्या इतिहासात सहा फलंदाजांनी एकाच डावात २०+ धावा आणि १५०+ स्ट्राइक रेट राखण्याची ही पहिलीच वेळ आहे.

  • डॉट बॉल्सची टंचाई : संपूर्ण डावात भारताने केवळ २६ डॉट बॉल्स खेळले. २० षटकांच्या पूर्ण डावात सर्वात कमी डॉट बॉल्स खेळण्याचा हा संयुक्त विक्रम आहे.

  • हार्दिक-तिलक यांची तुफानी भागीदारी : हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांनी केवळ ३१ चेंडूत ८४ धावांची अभेद्य भागीदारी केली (१६.२५ रन रेट).

झिम्बाब्वेला संथ गोलंदाजी ठरली महागडी

भारतीय फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या मध्यमगती गोलंदाजांना लक्ष्य केले. ताशी १२८ किमी पेक्षा कमी वेग असलेल्या चेंडूंवर भारताने १८.६० च्या रन रेटने धावा कुटल्या. झिम्बाब्वेने खेळवलेला जादा वेगवान गोलंदाज मापोसाला तर २ षटकांत ४० धावा मोजाव्या लागल्या.

‘आम्ही व्हिडिओ गेम खेळतोय असं वाटत होतं’ : अभिषेक शर्मा

फॉर्ममध्ये परतलेला अभिषेक शर्मा सामन्यानंतर म्हणाला, ‘संघासाठी योगदान देता आल्याचा आनंद आहे. कालच आम्ही फलंदाजी युनिट म्हणून ठरवलं होतं की, खेळपट्टीचा अंदाज आल्यावर फक्त स्वतःला एक्स्प्रेस करायचं, फटकेबाजी करायची. संघाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच मी आज हे करू शकलो.’

आता लक्ष्य: वेस्ट इंडिजविरुद्धचा 'नॉकआउट'

भारताने २५६ धावा करून नेट रन रेटमध्ये मोठी झेप घेण्याची तयारी केली आहे. आता झिम्बाब्वेला मोठ्या फरकाने हरवून भारत आपले स्थान भक्कम करेल. यानंतर होणारा भारत वि. वेस्ट इंडिज सामना हा ग्रुपमधील खऱ्या अर्थाने 'नॉकआउट' सामना ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT