भारतीय संघावर पैशांचा वर्षाव Pudhari Photo
स्पोर्ट्स

Champions Trophy | टीम इंडियाच्या खेळाडूंना कोट्यवधींचे बक्षीस; BCCI ने जाहीर केली रक्कम!

Champions Trophy | विजेत्या भारतीय संघावर पैशांचा वर्षाव

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) जिंकणाऱ्या भारतीय संघावर पैशांचा वर्षाव केला आहे. बीसीसीआयने टीम इंडियासाठी ५८ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. प्रत्येक खेळाडूला ३ कोटी रुपये, मुख्य प्रशिक्षकाला ३ कोटी रुपये आणि सहाय्यक प्रशिक्षक स्टाफला ५० लाख रुपये मिळतील, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एएनआयशी बोलताना दिली.

२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने हरवून विजेतेपद पटकावले. हे भारताचे सलग दुसरे आयसीसी स्पर्धा विजेतेपद होते. यापूर्वी २०२४ मध्ये टीम इंडियाने टी-२० विश्वचषक जिंकला होता.

Champions Trophy |  अंतिम सामन्यात काय घडले?

अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर न्यूझीलंडने ५० षटकांत सात विकेट्स गमावून २५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ४९ षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. रोहितने कर्णधारपदाची खेळी खेळली. त्याने ७६ धावा करून भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. ही भारताची सातवी आयसीसी ट्रॉफी होती. यापूर्वी, संघाने १९८३ आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक, २००७ आणि २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि २००२, २०१३ आणि २०२५ चा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला. त्याने सलग पाच सामने जिंकले होते. गट फेरीत बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर, भारतीय संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला आणि अंतिम फेरीत पुन्हा किवी संघाला हरवले.

चॅम्पियन झाल्यानंतर आयसीसीने त्यांच्यावर पैशांचा वर्षाव केला

विजेता झाल्यानंतर, विजेत्या भारतीय संघावर बक्षिसांच्या स्वरूपात पैशांचा पाऊस पडला. भारतीय संघाला २.४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे १९.५ कोटी रुपये मिळाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षीस रकमेत गेल्या वेळेच्या तुलनेत ५३ टक्के वाढ केली होती. या स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम ६.९ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ६० कोटी रुपये) पर्यंत वाढली. विजेत्या संघाव्यतिरिक्त, उपविजेत्या न्यूझीलंड संघाला १.१२ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ९.७२ कोटी रुपये) मिळाले, तर उपांत्य फेरीत बाहेर पडलेल्या दोन्ही संघांना, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला ५६,००० डॉलर्स (४.८६ कोटी रुपये) मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT