Team India's Next Test Captain : यंदाचे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता कसोटी कर्णधारपदाबरोबरच मधल्या फळीतील फलंदाजी मजबूत करण्याच आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. कसोटी कर्णधारपदी कोणाची निवड व्हावी, याबाबत दिग्गज क्रिकेटपटूंनी आपलं मत व्यक्त केले असून कसोटी कर्णधार म्हणून जसप्रीत बुमराह आणि शुभमन गिल यांची नावे आघाडीवर आहेत. तसेच केएल राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर याचेही नावे चर्चेत आहेत.
जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये भारतीय संघाला कसोटी मालिका खेळायची आहे. २००७ च्या दौऱ्यानंतर भारताने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकलेली नाही. कसोटी क्रिकेट संघाच्या नव्या कर्णधारपदाबाबत माजी सलामीवीर वसीम जाफर यांनी आपल्या 'एक्स' पोस्टमध्ये म्हटलं आहे की, " जसप्रीत बुमराहला विश्रांतीची आवश्यकता असेल तेव्हा शुभमन गिलने इंग्लंडच्या आगामी दौऱ्यावर कसोटी संघाचे नेतृत्व करावे. कर्णधारपदासाठी बुमराह हा पर्याय आहे. गिलला उपकर्णधार म्हणून कर्णधार म्हणून नियुक्त करावे. जेव्हा बुमराहला विश्रांतीची आवश्यकता असेल तेव्हा तो संघात येईल. अशा प्रकारे गिलला पूर्णवेळ कर्णधार होण्याच्या दबावाशिवाय देखील तयार केले जाऊ शकते."
बुमराहने तीन कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत पर्थ कसोटीचे नेतृत्त्व त्याने केले होते. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर बुमराहला पाठीला दुखापत झाली. त्याने दुसर्या डावात त्याला सक्तीची विश्रांती घ्यावी लागली होती. २०२३ मध्ये त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करावी लागली होती, त्यामुळे बुमराह दुबईमध्ये भारताच्या २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयी मोहिमेलाही मुकला होता. आता तंदुरुस्तीच्या समस्यांमुळे बुमराह इंग्लंड दौऱ्यात पाचही कसोटी सामने खेळणार का, या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी अनुत्तरीत आहे. शुभमन गिल आणि बुमराह यांच्याबरोबर केएल राहुल आणि ऋषभ पंत हे देखील भारताचे पुढील कसोटी कर्णधार होण्याच्या शर्यतीत आहेत. राहुलने तीन कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून, यामध्ये डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेशमध्ये २-० असा मालिका विजय समाविष्ट आहे.
आयसीसी रिव्ह्यूमध्ये बोलताना माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे की, कर्णधार म्हणून भविष्यात संघाचं नेतृत्व करण्याची क्षमता असणार्याशुभमन गिल व ऋषभ पंत यासारख्या तरुण खेळाडूंना संधी देण्यात यावी. जसप्रीत हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर कर्णधारपदासाठी नैसर्गिक पर्याय होता;पण त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविल्यास भारतीय संघातील एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज गमाविण्याची भीती आहे.
'स्टार स्पोर्ट्स'शी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, शुभमन गिलला किमान एक किंवा दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. गावस्कर यांनी ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यासह कर्णधारपदाच्या शर्यतीत असलेल्या इतर दोन तरुण खेळाडूंनाही हाच सल्ला दिला आहे. तिघेही तरुण खेळाडू आयपीएल २०२५ मध्ये अनुक्रमे त्यांच्या संघाचे नेतृत्व करत आहेत आणि या हंगामात ते तिघेही त्यांच्या संघाचे चांगले नेतृत्व करत आहेत. त्यांनी यांनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.