स्पोर्ट्स

Team India Schedule : भारतीय संघ आता पुढचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना कधी खेळणार? तारीख आली समोर

Team India Next T20 Series : पाच टी-२० सामन्यांची मालिका रंगणार

रणजित गायकवाड

मुंबई : भारतीय संघातील जवळपास सर्वच खेळाडू या महिन्याच्या अखेरीस आयपीएलच्या रणसंग्रामात उतरणार आहेत. तत्पूर्वी, भारतीय संघ आपला पुढचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना कधी आणि कुठे खेळणार, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. या संदर्भातील महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.

विश्वविजेतेपदाच्या थरारानंतर खेळाडू विश्रांतीवर

टी-२० विश्वचषक २०२६ चे जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय खेळाडू सध्या विश्रांती घेत आहेत. लवकरच हे सर्व खेळाडू आयपीएलमध्ये मैदा गाजवताना दिसतील. बीसीसीआयने आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले असून विविध संघांचे सराव शिबिरंही सुरू झाली आहेत. अशातच, भारतीय संघाच्या आगामी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याची तारीख निश्चित झाली आहे.

न्यूझीलंडला पराभूत करून टीम इंडियाने रचला इतिहास

भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक २०२६ चे विजेतेपद मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवला. सूर्यकुमार यादवने पहिल्यांदाच एखाद्या 'आयसीसी' (ICC) स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि पहिल्याच प्रयत्नात संघाला विश्वविजेतेपद मिळवून दिले.

२८ मार्चपासून आयपीएलचा थरार; भारतीय खेळाडू सज्ज

भारतीय खेळाडू आता २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये सहभागी होतील. या स्पर्धेचा अंतिम सामना ३१ मे रोजी होण्याची शक्यता आहे. आयपीएल संपल्यानंतर जून महिन्यात अफगाणिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील, मात्र यामध्ये एकही टी-२० सामना समाविष्ट नाही. त्यानंतर भारतीय संघ जुलै महिन्यात इंग्लंडच्या प्रदीर्घ दौऱ्यावर रवाना होईल.

इंग्लंड दौऱ्याचे सविस्तर वेळापत्रक

भारत आणि इंग्लंड यांच्यात जुलै महिन्यात मर्यादित षटकांची मालिका रंगणार आहे. यामध्ये तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांचा समावेश आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ याच मालिकेच्या निमित्ताने प्रथमच टी-२० फॉरमॅटमध्ये मैदानात उतरेल. विशेष म्हणजे, आयपीएलनंतर खेळाडूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळणार असून त्यानंतरच इंग्लंडविरुद्धची मालिका सुरू होईल.

टी-२० मालिकेतील पहिला सामना १ जुलै रोजी खेळवला जाईल आणि ही मालिका ११ जुलै पर्यंत चालेल. त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होईल. विशेष बाब म्हणजे, पुढील वर्षी 'एकदिवसीय विश्वचषक' असल्याने आता सर्वांचे लक्ष टी-२० ऐवजी एकदिवसीय क्रिकेटवर अधिक असेल. या दौऱ्यानंतर भारतीय संघ पुन्हा टी-२० सामने कधी खेळणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

मालिकेतील पहिला सामना १ जुलै २०२६ रोजी चेस्टर-ले-स्ट्रीट येथे खेळवला जाणार आहे. त्यानंतर मालिकेतील उर्वरित सामने ४ जुलै, ७ जुलै, ९ जुलै आणि ११ जुलै या तारखांना अनुक्रमे मँचेस्टर, नॉटिंगहॅम, ब्रिस्टॉल आणि साऊथॅम्प्टन येथे होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT