पुढारी ऑनलाईन डेस्क : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या विजयासह कांगारूंनी 5 सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. दरम्यान, ॲडलेड कसोटीच्या निकालानंतर डब्ल्यूटीसी फायनलची शर्यत रंजक बनली आहे.
ऑस्ट्रेलियाने भारताकडून अव्वल स्थान हिसकावून घेतले आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयाची टक्केवारी 60.71 झाली आहे. तर पराभवामुळे टीम इंडियाचे मोठे नुकसान झाले आहे. भारताने डब्ल्यूटीसीतील केवळ पहिले स्थानच गमावले नाही तर संघ टॉप-2 मधूनही बाहेर पडला आहे. या पराभवासह रोहित सेना 57.29 व्या विजयी टक्केवारीसह तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. द. आफ्रिका 59.26 टक्के गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
द. आफ्रिका मायदेशात श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. सध्या दुसरी कसोटी सुरू आहे. जर यजमान संघाने सामना जिंकला तर ते ऑस्ट्रेलियाला मागे टाकून WTC गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतील.