स्पोर्ट्स

Shubman Gill : शुबमन गिलमुळे टीम इंडियाचे संतुलन बिघडले?

२०२६ च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा प्रथम पसंतीचा यष्टिरक्षक कोण असेल, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

रणजित गायकवाड

नवी दिल्ली : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका जिंकली असली तरी, संघाचे कॉम्बिनेशन अजूनही परिपूर्ण दिसत नाहीये. २०२६ च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा प्रथम पसंतीचा यष्टिरक्षक कोण असेल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. कांगारूंविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये संजू सॅमसनला 'प्लेइंग-११' मध्ये संधी मिळाली.

कॅनबेरा टी-२० सामन्यात पावसामुळे संजूला फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यानंतर मेलबर्न येथील सामन्यात संजूला अचानक तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. पण त्या सामन्यात त्याच्या बॅटमधून केवळ २ धावा निघाल्या. मेलबर्न टी-२० मध्ये अपयशी ठरल्यानंतर संजू सॅमसनला प्लेइंग-११ मधून वगळण्यात आले.

पुढील तीन टी-२० सामन्यांमध्ये यष्टिरक्षक जितेश शर्माला प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळाले, जो ५व्या, ६व्या किंवा ७व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी एक योग्य पर्याय मानला जात आहे. जितेशने होबार्ट टी-२० मध्ये नाबाद २२ धावांची खेळी केली. पण गोल्ड कोस्ट टी-२० मध्ये त्याची बॅट शांत राहिली आणि तो केवळ ३ धावा जोडू शकला.

आशिया चषकापूर्वी संजू सॅमसन टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून उत्कृष्ट कामगिरी करत होता. संजूने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जी तीन शतके झळकावली आहेत, ती गेल्या वर्षी सलामीला खेळतानाच आली होती. त्यापैकी दोन शतके त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, तर एक शतक बांगलादेशविरुद्ध ठोकले होते. मात्र, मधल्या फळीत त्याच्यावर भारतीय संघ व्यवस्थापनाचा तेवढा विश्वास दिसत नाहीये.

संजू सॅमसनने भारतासाठी ५१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २५.५१ च्या सरासरीने ९९५ धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. संजूने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली असली तरी, मधल्या फळीत तो अयशस्वी ठरला आहे. मधल्या फळीत संजूची सरासरी २०.५६ इतकी असून, त्याला केवळ २ अर्धशतके झळकावता आली आहेत.

२०२५ च्या आशिया चषकाद्वारे शुभमन गिलचे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले, तेव्हा संजू सॅमसनकडून सलामीची जागा हिसकावली गेली. आशिया चषकात संजूला एकाही सामन्यात सलामीला खेळण्याची संधी मिळाली नाही आणि शुभमनसोबत अभिषेक शर्माने भारतीय संघासाठी डावाची सुरुवात केली. गिल कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार झाला आहे. त्याचबरोबर टी-२० आंतरराष्ट्रीय संघातही त्याला उपकर्णधारपद सोपवण्यात आले, ज्यामुळे प्लेइंग-११ मधील त्याची जागा निश्चित झाली आहे.

मात्र, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यापासून शुभमनने काही खास कामगिरी केलेली नाही. या वर्षी १२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शुभमनने २८.७७ च्या सरासरीने २५९ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने एकही अर्धशतक झळकावलेले नाही आणि ४७ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे.

वास्तविक पाहिल्यास, गिलला संघात सामावून घेण्याच्या नादात भारतीय संघाचे संतुलन बिघडत आहे. आशिया चषकासाठी संघाची घोषणा करताना मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी सांगितले होते की, शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वालसारखे खेळाडू अनुपलब्ध असल्याने संजू सॅमसनला संधी मिळाली.

आशिया चषकात शुभमनची कामगिरी संजूच्या तुलनेत चांगली नव्हती. शुभमनने ७ डावांमध्ये २१.१६ च्या सरासरीने १२७ धावा केल्या होत्या, तर संजूने चार डावांमध्ये ३३.०० च्या उत्कृष्ट सरासरीने १३२ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या टी२० मालिकेत शुभमन गिलने ५ डावांमध्ये ४४ च्या सरासरीने १३२ धावा जरूर केल्या, परंतु तो तेवढा लयीत दिसला नाही. ऑस्ट्रेलिया मालिकेत शुभमनचा स्ट्राइक रेट देखील १३६.०८ इतका होता. याउलट, त्याचा सलामीचा साथीदार अभिषेक शर्माने १६१.३८ च्या दमदार स्ट्राइक रेटने १६३ धावा स्कोर केल्या.

तर, आता टी-२० संघातून संजूला वगळले जाईल का?

शुभमन गिलच्या पुनरागमनानंतर संजू सॅमसनला प्लेइंग-११ मध्ये जागा मिळवता येत नाहीये, आणि ती सुद्धा केवळ मेलबर्न टी२० मधील खराब कामगिरी नंतर. संजूला प्लेइंग-११ मध्ये त्याची जागा परत मिळवण्याची संधी मिळेल की नाही, हे ९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत स्पष्ट होईल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. मात्र सॅमसन संघात निश्चितच भाग असेल, अशी अपेक्षा आहे. पण प्लेइंग-११ मध्ये त्याचे पुनरागमन कठीण दिसत आहे. जर संजूला संधी मिळाली आणि तो अपेक्षांवर खरा उतरला नाही, तर त्याला टी-२० संघातून वगळले जाण्याची शक्यता आहे. ऋषभ पंत, ध्रुव जुरेल यांच्यासारखे यष्टिरक्षक उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्यांची टी-२० संघात निवड झाली तर, त्यात आश्चर्य वाटायला नको.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT