राहुल द्रविड यांचा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपुष्टात आला. Twitter
स्पोर्ट्स

Rahul Darvid : द्रविड गुरुजींचा कोचिंग कार्यकाळ संपुष्टात, जाणून घ्या रिपोर्ट कार्ड

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rahul Dravid Report Card : टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद भारताने पटकावले. शनिवारी झालेल्या फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून ट्रॉफीवर नाव कोरले. भारताच्या या विजयानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती घेतली. यासह भारतीय क्रिकेटच्या एका युगाचा अंत झाला. तसेच राहुल द्रविड यांचा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपुष्टात आला.

सज्जन परंपरेतील खेळाडू, पण...

भारतीय संघ तब्बल 11 वर्षांनंतर आयसीसीचे मोठे जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला. या विजेतेपदापूर्वी 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली ब्लू टीमने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. जेतेपद पटकावल्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड खूपच आनंदी दिसत होते. ते ट्रॉफीसोबत सेलिब्रेशन करतानाही दिसले. संयम आणि शांततेत काम करणारे द्रविड हे खेळाच्या सज्जन परंपरेतील खेळाडू म्हणून ओळखले जातात. ते क्वचितच आपल्या भावना व्यक्त करतात. पण 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकल्यानंतर तेही भावूक झाले. विराट कोहलीने द्रविड यांच्याकडे ट्रॉफी सोपवल्यानंतरचा क्षण तर पाहण्यासारखा होता. ते संघातील सर्वांसह आनंदाने मोठमोठ्याने ओरडताना दिसले. ते असे काही करतील असे क्वचितच कुणाला वाटले असेल.

द. आफ्रिकेविरुद्धचा कसोटी मालिकेतील पराभव दुखावणार

नोव्हेंबर 2021 मध्ये टीम इंडियाचे प्रशिक्षक बनताच द्रविड यांच्या पुढील आव्हानांना सुरुवात झाली. रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात भारताने चांगली कामगिरी केली होती. तीच परंपरा पुढेही कायम ठेवण्याची जबाबदारी द्रविड यांच्यावर होती. त्यांचा स्वभाव शास्त्री यांच्यापेक्षा वेगळा होता, पण ती जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली. ते ऑस्ट्रेलियाला प्रशिक्षक म्हणून गेले नाहीत पण त्यांनी कांगारू संघाला वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये पराभूत केले. मात्र, द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभव त्यांना दुखावणार होता.

द्रविड यांचे कोचिंग रेकॉर्ड कसे राहिले?

द्रविड यांनी प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारताने 24 कसोटी सामने खेळले. यापैकी 14 जिंकले, तर सात हरले. यादरम्यान, तीन सामन्यांचा निकाल लागला नाही. द्रविड गुरुजींच्या प्रशिक्षणाखाली भारत 2021-2023 कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला. मात्र, तिथे ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताने 53 सामने खेळले आणि 36 जिंकले, 14 गमावले आणि तीन सामन्यांचा निकाल लागला नाही. 2023 च्या वनडे विश्वचषकातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव हा सर्वात जिव्हारी लागणारा ठरला. द्रविड यांच्या कारकिर्दीतील भारतीय संघाने टी-20 क्रिकेटमध्ये 71 पैकी 54 सामने जिंकले आणि 16 गमावले. एका सामन्याचा निकाल लागला नाही. 54 पैकी भारताने सुपर ओव्हरमध्ये दोन सामने जिंकले.

एक खेळाडू म्हणून मी ट्रॉफी जिंकू शकलो नाही. पण मी माझे सर्वोत्तम दिले. भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून संधी मिळाली, त्याचा मला अभिमान आहे. माझ्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाच्या माझ्या खेळाडूंनी विश्वचषक उंचावला यासाठी मी नशीबवान आहे. हे विजेतेपद म्हणजे सांघिक खेळाचे प्रतिक आहे. हा विजय म्हणजे अद्भुत अनुभूती आहे.
राहुल द्रविड

2007 च्या वेदना

राहुल द्रविड यांची 2007 च्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यादरम्यान वेस्ट इंडिजमध्ये आयसीसीचा महाकुंभही आयोजित करण्यात आला होता. पण टीम इंडियाला अपयशाचा सामना करावा लागला. अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेला तत्कालीन संघ स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतून बाहेर पडला. त्यानंतर द्रविड यांच्या कर्णधारपदावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर त्यांनी कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

द्रविडची इच्छा पूर्ण

2007 मध्ये राहुल द्रविड त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी ट्रॉफी जिंकू शकले नव्हते. पण आता त्यांनी इतिहास रचला आहे. त्याच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यांच्या या महान कार्याला लोक सलाम करत आहेत. आयपीएल टीम दिल्ली कॅपिटल्सनेही एका पोस्टद्वारे त्यांचे कौतुक केले आहे. फ्रँचायझीने द्रविडचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या छायाचित्रात ते 2007 च्या निराशेनंतर भावूक झालेले दिसत आहेत, तर दुसऱ्या छायाचित्रात ते यशानंतर खूप आनंदी दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्समे पोस्टमध्ये म्हटलंय की, ‘ज्यांची स्वतःची स्वप्ने पूर्ण होत नाहीत, ते इतरांची स्वप्ने पूर्ण करतात.’

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT