नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. 21 ते 31 जानेवारीदरम्यान होणारी ही मालिका 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारताची महत्त्वाची तयारी मानली जात होती.
गेल्या आठवड्यात वडोदरा येथे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान सुंदरच्या बरगड्यांच्या खालच्या भागात स्नायू दुखावले होते. या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही.
वॉशिंग्टन सुंदर 7 फेब्रुवारी रोजी मुंबईत अमेरिकेविरुद्ध होणाऱ्या भारताच्या पहिल्या विश्वचषक सामन्यापर्यंत तंदुरुस्त होईल की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एकदिवसीय मालिकेत त्याच्या जागी आयुष बदोनीचा समावेश करण्यात आला आहे, मात्र टी-20 संघात कोणाला संधी मिळेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, शस्त्रक्रिया केल्यामुळे तिलक वर्मा देखील पहिल्या तीन टी-20 सामन्यांसाठी उपलब्ध नसेल. भारतीय संघात हार्दिक पंड्या, उपकर्णधार अक्षर पटेल, अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे यांसारख्या अष्टपैलू खेळाडूंचे पुनरागमन झाल्यामुळे सुंदरची अनुपस्थिती भारताला फारशी जाणवणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
न्यूझीलंड टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा (पहिल्या तीन सामन्यांसाठी अनुपलब्ध), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर (दुखापतग्रस्त), इशान किशन (यष्टिरक्षक).