स्पोर्ट्स

Rohit Sharma stand in Wankhede Stadium : वानखेडे स्टेडियमधील ‘रोहित शर्मा स्टँड’चे उद्घाटन! मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘हिटमॅन’चा गौरव

‘वानखेडे’मध्ये अजित वाडेकर, शरद पवार यांच्या नावाच्या स्टँड्सचेही उद्घाटन झाले. भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला.

रणजित गायकवाड

rohit sharma stand inauguration at wankhede stadium

भारतीय क्रिकेटचा कर्णधार आणि मुंबईचा अभिमान रोहित शर्मा याच्या क्रिकेटमधील भरीव योगदानाचा गौरव म्हणून मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियममध्ये त्याच्या नावाने खास स्टँड उभारण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 16) या स्टँडचे भव्य उद्घाटन पार पडले. या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, MCA अध्यक्ष अजिंक्य नाईक, माजी MCA अध्यक्ष शरद पवार आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह भारतीय क्रिकेट मंडळाचे अधिकारी, माजी खेळाडू आणि क्रिकेटच्या चाहत्यांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माच्या सन्मानार्थ MCA (मुंबई क्रिकेट असोसिएशन) ने हा स्टँड उभारण्याचा निर्णय घेतला होता.

उद्घाटनप्रसंगी रोहितने भावना व्यक्त करताना म्हटले, "माझ्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात याच मैदानावर झाली आणि आज माझ्या नावाचा स्टँड इथे असणं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ही बाब मी कायम मनात जपून ठेवीन."

मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA)तर्फे वानखेडे स्टेडियममध्ये अजित वाडेकर, शरद पवार यांच्या नावाच्या स्टँड्सचे उद्घाटन झाले. भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे.

रोहित शर्माला खास सन्मान

वानखेडे स्टेडियममधील डिवेचा पॅव्हिलियनच्या तिसऱ्या मजल्यावरील स्टँडचे नामकरण ‘रोहित शर्मा स्टँड’ असे करण्यात आले आहे. रोहितने 499 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 19,700 धावा आणि 49 शतके केली असून, त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2024 चा T20 विश्वचषक आणि 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतपद पटकावले. मुंबई इंडियन्सला त्याच्या कर्णधारपदाखाली पाच IPL विजेतेपदे मिळाली.

अजित वाडेकर आणि शरद पवार यांचाही गौरव

यासोबतच, भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या नावाने एक स्टँड आणि माजी MCA अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने दुसरे स्टँडची उभारणी करण्यात आली आहे. अजित वाडेकर यांनी 1971 मध्ये भारताला वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकून दिल्या, तर शरद पवार यांनी MCA आणि BCCI च्या अध्यक्षपदावर कार्यरत असताना क्रिकेटच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. तसेच, माजी MCA अध्यक्ष अमोल काळे यांच्या स्मरणार्थ MCA ऑफिस लाऊंजचेही उद्घाटन झाले.

MCA चा ऐतिहासिक निर्णय

MCA ने एप्रिल 2025 मधील 86व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेतला. “या तिन्ही दिग्गजांनी मुंबई आणि भारतीय क्रिकेटला जागतिक पातळीवर पोहचवले. त्यांच्या योगदानाचा हा सन्मान आहे,” असे MCA अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले.

उत्साह

रोहित शर्मा, अजित वाडेकर आणि शरद पवार यांच्या नावाने स्टँड्सची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सोशल मीडियावर या निर्णयाचे कौतुक झाले, अनेकांनी हा क्षण ‘मुंबई क्रिकेटसाठी ऐतिहासिक’ असल्याचे म्हटले आहे.

वानखेडेचा वारसा

वानखेडे स्टेडियम हे मुंबई क्रिकेटचे हृदय आहे. या स्टँड्सच्या उद्घाटनामुळे स्टेडियमचा वारसा आणखी समृद्ध होणार आहे. उद्घाटनानंतर रोहित शर्मा 21 मे 2025 रोजी वानखेडेवर मुंबई इंडियन्ससाठी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार आहे, जिथे चाहते रोहितच्या नावाचा जयघोष करत स्टँडच्या सन्मानाचा आनंद घेतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT