पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर- गावस्कर ट्राफीचा पाचवा आणि निर्णायक कसोटी सामना सिडनी क्रिकेट मैदानावर सुरु आहे. खेळाचा आज शनिवारचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, आज दुसऱ्या दिवशी भारताला मोठा धक्का बसला. टीम इंडियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) जखमी झाला आहे. सिडनीतील नवीन वर्षातील कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लंचब्रेकनंतर केवळ एक षटक टाकून बुमराहला मैदान सोडावे लागले. तो टीमचे डॉक्टर आणि सुरक्षा अधिकाऱ्यासह ड्रेसिंग रूममधून बाहेर पडताना दिसला.
बुमराहने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ९ डावांत १५२.१ षटके टाकली. त्याने ३२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय गोलंदाजाच्या सर्वाधिक विकेट्स घेण्याचा बिशन बेदी यांचा विक्रम मागे टाकला. बुमराहने सकाळच्या सत्रातील पाच पैकी तीन षटके मैदानाबाहेर घालवली होती. शेवटच्या दोन षटकांसाठी तो परत आला. त्याने लंच ब्रेकनंतर पुन्हा गोलंदाजी सुरू केली. त्याने ॲलेक्स कॅरीला पहिला चेंडू टाकला. पण सुरुवातीला त्याच्या गोलंदाजीचा वेग कमी राहिला. बुमराहने हे षटक टाकल्यानंतर लगेचच मैदान सोडले आणि तो सिडनी क्रिकेट मैदान (SCG) सोडून कारमधून जाताना दिसला.
टीम इंडियाने उपकर्णधार निवडलेला नाही. बुमराहकडे उपकर्णधारपद होते. पण रोहित शर्माने त्याच्या खराब फॉर्ममुळे अंतिम कसोटी सामन्यातून स्वतः बाजूला होत सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. यामुळे उपकर्णधार जसप्रीत बुमराह याच्याकडे संघाचे नेतृत्त्व देण्यात आले. दरम्यान, जखमी झालेल्या बुमराहने मैदान सोडल्याने विराट कोहलीने दुसऱ्या दिवसाच्या मधल्या सत्रासाठी संघाचे नेतृत्व हाती घेतले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्यासाठी भारताला सिडनी कसोटी जिंकणे आवश्यक आहे.
भारताने पहिल्या डावात १८५ धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८१ धावांवर गुंडाळला. भारताने दुसऱ्या डावात आघाडी घेतली आहे.