मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसले आहेत. स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्तीपाठोपाठ आता फॉर्मात असलेला अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे आगामी आंतरराष्ट्रीय टी-२० (T20I) मालिकेतून बाहेर पडला आहे. आगामी आव्हानात्मक दौरा लक्षात घेता, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नितीश रेड्डीचा पर्याय म्हणून मुंबईच्या युवा आणि आक्रमक सूर्यांश शेडगेची भारतीय संघात निवड केली आहे.
भारतीय संघाचा आयर्लंड दौरा येत्या २६ जूनपासून सुरू होत असून, या दौऱ्यात संघ दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर लगेचच १ जुलैपासून भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून तिथे ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. मात्र, या दोन्ही महत्त्वाच्या मालिकांना नितीश रेड्डी मुकणार असल्याने भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर नितीश रेड्डीने डाव्या पायाच्या स्नायूंमध्ये त्रास होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर करण्यात एमआरआय चाचणी करण्यात आली. यात पायाला सूज असल्याचे स्पष्ट झाल. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला बंगळुरू येथील 'सेंटर ऑफ एक्सलन्स' (COE) येथे पुनर्वसन (Rehabilitation) प्रक्रियेतून जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो आगामी एकूण ७ टी-२० सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.
नितीश रेड्डी व्यतिरिक्त फिरकीपटू वरुण चक्रवर्ती देखील आयपीएल २०२६ (IPL 2026) दरम्यान डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे सध्या बंगळुरूमध्ये रिहॅब प्रक्रियेत आहे. खेळाडूंच्या फिटनेसला प्राधान्य देत व्यवस्थापनाने घाईगडबडीत त्यांना मैदानात न उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
२३ वर्षीय अष्टपैलू खेळाडू सूर्यांश शेडगेला श्रीलंका येथे नुकत्याच पार पडलेल्या त्रिकोणी मालिकेत भारत 'अ' संघासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. सूर्यांशने या स्पर्धेत मध्यक्रमात फलंदाजी करताना ५ सामन्यांत १४७ धावा केल्या, तसेच २३ षटके गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. याशिवाय, २०२४-२५ मध्ये सय्यद मुश्ताक अली करंडक जिंकणाऱ्या मुंबई संघाचा तो महत्त्वाचा शिलेदार होता. या स्पर्धेत त्याने खालच्या मध्यक्रमात फलंदाजी करताना २५१.९२ च्या तुफानी स्ट्राईक रेटने १३१ धावा कुटल्या होत्या. त्याची हीच अष्टपैलू क्षमता पाहून निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.
आयर्लंडविरुद्धची ही मालिका नवनियुक्त टी-२० कर्णधार श्रेयस अय्यर याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयसकडे या फॉरमॅटचे नेतृत्व सोपवण्यात आले असून, कर्णधार म्हणून तो पहिल्यांदाच मैदानात उतरेल. भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामना २६ जून रोजी तर दुसरा सामना २८ जून रोजी बेलफास्ट येथील स्टॉर्मॉन्ट क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल.
आयर्लंडविरुद्धचा टी-२० संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी, प्रसिद्ध कृष्णा, सूर्यांश शेडगे.
इंग्लंडविरुद्धचा टी-२० संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती.