स्पोर्ट्स

IND vs NZ T20 Series : शेवटच्या सामन्यात किवींचा तडाखा, पण मालिका भारताचीच! ३-२ ने ट्रॉफीवर टीम इंडियाचे नाव

चौथ्या टी-20 सामन्यात टिम सेफर्टची वादळी खेळी, किवींचा १२ चेंडू-७ विकेट्स राखून दणदणीत विजय

रणजित गायकवाड

हॅमिल्टन : टिम सेफर्टच्या घणाघाती ९३ धावा आणि ग्लेन फिलिप्सच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने पाचव्या टी-२० सामन्यात भारताचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. भारताने विजयासाठी ठेवलेले १९२ धावांचे आव्हान किवींनी अवघ्या १८ षटकांत ३ बाद १९५ धावा करत सहज पार केले. अखेरच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला, तरी भारतीय संघाने पाच सामन्यांची ही टी-२० मालिका ३-२ अशा फरकाने जिंकत मालिकेवर आपले नाव कोरले.

टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय भारताच्या आघाडीच्या फळीने सुरुवातीलाच संकटात सापडवून सार्थ ठरवला. ॲडम मिलनेने सुरुवातीलाच तडाखा देत अभिषेक शर्मा (१) आणि संजू सॅमसन (४) यांना स्वस्तात माघारी धाडले. अवघ्या १९ धावांवर २ गडी गमावल्यानंतर इशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी किवी आक्रमणावर प्रत्याक्रमण चढवले. इशानने ३२ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६१ धावांची वादळी खेळी केली, तर श्रेयस अय्यरने केवळ २३ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५० धावा ठोकत किवी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले.

या दोघांनी ९३ धावांची भागीदारी रचून भारताला सामन्यात परत आणले. मात्र, ते बाद झाल्यानंतर तळाचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. शेवटी नमन धीरने २३ चेंडूंत ३३ धावा जोडल्याने भारताने २० षटकांत ८ बाद १९१ धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून ॲडम मिलनेने भेदक मारा करत ४ षटकांत अवघ्या १९ धावा देऊन ४ बळी टिपले.

१९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ॲलन (२) लवकर बाद झाला खरा, पण त्यानंतर टिम सेफर्टने भारतीय गोलंदाजांवर अक्षरशः हल्लाबोल चढवला. सेफर्टने ५० चेंडूंत ११ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकारांची आतषबाजी करत ९३ धावांची एकतर्फी खेळी केली. त्याला डॅरिल मिचेल (१६ चेंडूंत २९ धावा) आणि ग्लेन फिलिप्सने तोडीस तोड साथ दिली. फिलिप्सने भारतीय आक्रमणाचा समाचार घेत ३८ चेंडूंत नाबाद ६५ धावा (८ चौकार, ३ षटकार) कुटल्या.

भारतीय गोलंदाजांना किवी फलंदाजांचा झंझावात रोखता आला नाही. भुवनेश्वर कुमार (४१ धावा), अर्शदीप सिंग (४० धावा), वरुण चक्रवर्ती (४५ धावा) आणि प्रिन्स यादव (३५ धावा) या सर्वच मुख्य गोलंदाजांची न्यूझीलंडने जोरदार धुलाई केली. १२ चेंडू आणि ७ गडी राखून विजय मिळवत न्यूझीलंडने मैदानात एकतर्फी वर्चस्व गाजवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT