पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (19 सप्टेंबर) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू झाला. आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने 4 गडी गमावून 158 धावा केल्या आहेत. नझमुल हुसेन शांतो आणि शाकिब अल हसन क्रीजवर आहेत. सध्या खराब प्रकाशामुळे खेळ थांबला आहे. या सामन्यात भारताने बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे लक्ष्य दिले आहे.
भारताच्या पहिल्या डावात रविचंद्रन अश्विन (113) आणि रवींद्र जडेजा (86) यांनी शानदार फलंदाजी करक मोठी धावसंख्या उभारण्यात महत्वाची भूमिका बजावली. तर गोलंदाजीमध्ये बांगला देशकडून 24 वर्षीय हसन महमूदने सर्वाधिक 5 बळी घेतले. चेन्नई कसोटीच्या पहिल्या दिवशी पहिल्या डावात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. अवघ्या 34 धावांत रोहित (6), गिल (0), कोहली (6) बाद झाले. यावेळी ऋषभ पंत (39) लयीत दिसत होता, पण तोही हसन महमूदचा बळी ठरला. यशस्वी जैस्वाल विकेटवर टिकून राहिला. तो 56 धावांची खेळी करून बाद झाला.
त्यानंतर केएल राहुल 52 चेंडूत 16 धावा करून तंबूत परतला. यानंतर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी 199 धावांची भागिदारी करत संघाचा डाव सांभाळला. हसन महमूदच्या पाच बळींशिवाय तस्कीन अहमदने 3 बळी घेतले. तर मेहदी हसन मिराज आणि नाहिद राणा यांना प्रत्येकी 1 यश मिळाले. भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये पाच बळी घेणारा हसन महमूद बांगलादेशचा पहिला गोलंदाज ठरला.
बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 149 धावांवर आटोपला. त्याच्याकडून शाकिब अल हसनने (32) सर्वाधिक धावा केल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. बुमराहशिवाय आकाश दीप, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
भारताला दुसऱ्या डावात तिसऱ्याच षटकातच पहिला धक्का बसला. कर्णधार रोहित शर्माला वेगवान गोलंदाज तस्किन अहमदने झाकीर हसनकरवी झेलबाद झाला. रोहितने 5 धावा केल्या. यानंतर वेगवान गोलंदाज नाहिद राणाच्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल यष्टिरक्षक लिटन दासकरवी झेलबाद झाला.
त्यानंतर भारताने 67 धावांवर विराट कोहलीची विकेटही गमावली. फिरकी गोलंदाज मेहदी हसन मिराजच्या चेंडूवर कोहली एलबीडब्ल्यू आऊट झाला. कोहलीने 37 चेंडूंचा सामना करत 17 धावा केल्या, ज्यात दोन चौकारांचा समावेश होता. यानंतर शुभमन गिल आणि ऋषभ पंत ही जोडी क्रीजवर स्थिरावली. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी झाली. ऋषभ पंतने 128 चेंडूंचा सामना करत 109 धावा केल्या. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे सहावे शतक होते. पंत बाद झाल्यानंतर काही वेळातच शुभमन गिलनेही आपले शतक पूर्ण केले. शुभमन 119 धावा करून नाबाद परतला. शुभमनने आपल्या खेळीत 10 चौकार आणि चार षटकार मारले. शुभमनचे कसोटी कारकिर्दीतील हे पाचवे शतक आहे. तर, केएल राहुल 22 धावांवर नाबाद राहिला.
लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली. शादमान इस्लाम आणि झाकीर हसन यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ही भागीदारी तोडली. त्याने झाकीरला यशस्वी जैस्वालकरवी झेलबाद केले. झाकीरने आपल्या खेळीत 33 धावा केल्या. त्यानंतर ऑफस्पिनर आर. अश्विनने शादमान इस्लामला पायचीत करत बांगलादेशला दुसरा धक्का दिला. शदमानने बाद होण्यापूर्वी 35 धावा केल्या. यानंतर अश्विनने मोमिनुल हकच्या गोलंदाजीवर भारतीय संघाला तिसरे यश मिळवून दिले. मोमिनुल (13) बाद झाला तेव्हा बांगलादेशची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 124 धावा होती. अश्विनने विकेट घेण्याची धडाका सुरूच ठेवली. यानंतर त्याने मुशफिकुर रहीमला (13) केएल राहुलकडे झेलबाद केले. अश्विनने रहिमला कसोटी क्रिकेटमध्ये पाचव्यांदा बाद केले आहे.