indian spinner piyush chawla retired from all forms of cricket
भारताचा स्टार लेग-स्पिनर पीयूष चावला याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने शुक्रवारी (दि. 6) इंस्टाग्राम पोस्टद्वारे याची घोषणा केली. पीयूष 2007 चा टी-20 विश्वचषक आणि 2011 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. त्याने भारतासाठी शेवटचा सामना 2012 मध्ये खेळला.
पीयूषने 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या वर्षी त्याने मोहाली येथे इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. त्यानंतर 2007 मध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यात आणि 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 सामन्यात पदार्पण केले.
पुढे तो भारतासाठी केवळ तीन कसोटी खेळू शकला. तर 25 वनडे आणि सात टी-20 सामने टीम इंडियाकडून खेळण्याची संधी त्याला मिळाली. त्याच्या नावावर कसोटीत सात विकेट्स, वनडेमध्ये 32 विकेट्स आणि टी-20 मध्ये चार विकेट्स आहेत. आयपीएलमध्ये त्याने 192 सामन्यांमध्ये 192 विकेट्स घेतल्या. गेल्या वर्षी तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. तथापि, मेगा लिलावापूर्वी त्याला रिलीज करण्यात आले आणि लिलावात कोणीही त्याला खरेदी केले नाही. यानंतर, तो यंदा आयपीएलमध्ये समालोचन करताना दिसला.
पीयूषने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना डिसेंबर 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला. तर त्या आधीच्या वर्षी म्हणजे 201 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. तर त्याने टी-20 करिअरमधील शेवटचा सामना 2012 मध्ये वानखेडे येथे इंग्लंडविरुद्ध खेळला. त्यानंतर तो कधीही टीम इंडियामध्ये स्थान मिळवू शकला नाही. तथापि, तो आयपीएल खेळत राहिला आणि या लीगमधील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे.
कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ने 2014 चे आयपीएल विजेतेपद जिंकले. चावला त्या विजेत्या संघाचा सदस्य होता. विजेतेपदाच्या सामन्यात चावलाने विजयी चौकार मारला होता. तर त्या सामन्यात गोलंदाजीत त्याने 4 षटकांच्या कोट्यात 44 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. चावलाने त्या हंगामात 14 सामन्यांमध्ये 21.64 च्या सरासरीने आणि 7.67 च्या इकॉनॉमी रेटने 14 विकेट्स मिळवल्या होत्या.
युजवेंद्र चहल (205 बळी) नंतर पीयूष चावला हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. तो या लीगमध्ये मुंबई इंडियन्स (एमआय), चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके), कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि पंजाब किंग्ज (पीबीकेएस) कडूनही खेळला. त्याने 192 सामन्यांमध्ये या खेळाडूने 26.60 च्या सरासरीने 192 विकेट घेतल्या. 17 धावांत 4 बळी ही त्याची त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
पियुषने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं की, ‘दोन दशकांहून अधिक काळ मैदानावर असताना, या सुंदर खेळाला निरोप देण्याची वेळ आली आहे. भारतीय संघाकडून सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करण्यापासून ते 2007 आणि 2011 च्या विश्वचषक विजयाचा भाग होण्यापर्यंत, या प्रवासातील प्रत्येक क्षण आशीर्वादापेक्षा कमी नव्हता. हे सर्व क्षण माझ्या हृदयात कोरले गेले आहेत. नेहमीच त्यांची साथ राहिली. आज माझ्यासाठी खूप भावनिक दिवस आहे कारण मी अधिकृतपणे सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटला निरोप देत आहे.’
भारतीय फिरकी गोलंदाजाने निवृत्तीच्या पोस्टमध्ये आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचे आभार मानले. याशिवाय, त्याने प्रशिक्षकांसह बीसीसीआय आणि उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनचेही आभार मानले.