मुंबई : लॉस एंजिल्स येथे २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. या ऐतिहासिक स्पर्धेत एकूण ६ संघ सहभागी होणार असून, आयसीसीने यासाठीचे पात्रता नियम आधीच जाहीर केले आहेत. सध्या आयसीसी टी-२० संघ क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा ऑलिम्पिकमधील थेट प्रवेश जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र, इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तीन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागल्याने टीम इंडियाचे अव्वल स्थान धोक्यात आले असून ऑलिम्पिकमधील थेट पात्रतेबाबत कमालीची चिंता वाढली आहे.
आयसीसीने २०२८ ऑलिम्पिकसाठी जाहीर केलेल्या पात्रता नियमांनुसार, आशिया, युरोप, आफ्रिका आणि ओशनिया या चार खंडांमधील अव्वल मानांकित प्रत्येकी एका संघाला स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. याशिवाय, यजमान देश म्हणून अमेरिकेचा संघ आधीच थेट पात्र ठरला आहे. २०२६ च्या अखेरपर्यंत आपापल्या खंडात अव्वल स्थानी राहणाऱ्या संघांना ही थेट लॉटरी लागणार असून, सहाव्या संघाचा निर्णय पात्रता फेरीच्या माध्यमातून घेतला जाणार आहे.
भारतीय संघ सध्या आशिया खंडात टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. परंतु, अलिकडच्या काळातील सुमार कामगिरी अशीच सुरू राहिली, तर भारताचे मानांकन घसरू शकते. अशा स्थितीत आशिया खंडातील अव्वल स्थान पटकावण्यासाठी पाकिस्तानला मोठी संधी मिळू शकते.
सध्याच्या घडीला भारतीय संघ २६९ रेटिंगसह टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे, तर पाकिस्तानचा संघ २४० रेटिंग रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहे. गुणांमधील हा फरक लक्षात घेता, जर टीम इंडियाने आपल्या कामगिरीत तातडीने सुधारणा केली नाही आणि पाकिस्तानने वर्षाच्या अखेरपर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी दाखवली, तर ते आशियातील अव्वल मानांकित संघ बनू शकतात. परिणामी, ऑलिम्पिक २०२८ चे थेट तिकीट पाकिस्तानच्या खिशात जाऊ शकते.
इंग्लंडविरुद्धची चालू टी-२० मालिका संपल्यानंतर भारतीय संघाला या वर्षाच्या अखेरपर्यंत आणखी चार द्विपक्षीय टी-२० मालिकांमध्ये खेळायचे आहे. यामध्ये जुलै महिन्याच्या अखेरीस झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन सामन्यांची मालिका होणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल.
ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून तिथे ५ सामन्यांची टी-२० मालिका रंगेल, तर वर्षाच्या शेवटी श्रीलंकेविरुद्ध मायदेशात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमधील थेट प्रवेश अबाधित राखण्यासाठी आगामी प्रत्येक मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.