पुढारी ऑनलाईन डेस्क : T20i Rankings Update : न्यूझीलंड महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. 21 मार्चपासून सुरू झालेल्या या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर ICC ने महिला टी-20 क्रमवारीचे नवे अपडेट जाहीर केले आहेत. फलंदाजी क्रमवारीत पहिल्या 9 स्थानांवर कोणताही बदल झालेला नाही, मात्र 10व्या स्थानावर संयुक्तरित्या तीन फलंदाजांनी आपले स्थान कायम राखले आहे.
ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मूनी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. तिने न्यूझीलंडविरुद्ध सलग दोन अर्धशतके झळकावून आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. तिचे रेटिंग 798 पर्यंत पोहचले आहे. दुसऱ्या क्रमांकावर ताहलिया मॅकग्रा, तिसऱ्या स्थानी भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना (753) आहे. टॉप 5 मध्ये वेस्ट इंडीजची कर्णधार हेली मॅथ्यूज चौथ्या आणि द. आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ट पाचव्या क्रमांकावर आहेत.
सहाव्या स्थानावर श्रीलंकेची कर्णधार चामारी अटापट्टू आहे जिचे रेटिंग 689 आहे. न्यूझीलंडची सुझी बेट्स सातव्या स्थानावर, द. आफ्रिकेची तझमिन ब्रिट्स आठव्या स्थानावर आणि ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हीली नवव्या स्थानावर आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर 628 रेटिंगसह 10 व्या स्थानावर आहे. तिच्यासोबत वेस्ट इंडिजची डिएंड्रा डॉटिन आणि इंग्लंडची डॅनी वायट-हॉज याच क्रमांकावर आहेत.
इंग्लंडच्या नेट सीव्हर-ब्रंटला एका स्थानाचा फायदा झाला आहे. ती 13व्या स्थानावर पोहोचली आहे. दरम्यान, न्यूझीलंडच्या सोफी डिवाइनला चार स्थानांचा फटका बसला आहे. ती 14व्या क्रमांकावर पोहचली आहे. न्यूझीलंडची अमेलिया केर (WPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग) दोन स्थानांच्या बढतीसह 17व्या स्थानावर पोहोचली आहे.
महिला टी-20 गोलंदाजी क्रमवारीत इंग्लंडची सोफी एक्लेस्टन अजूनही अव्वल स्थानी कायम आहे. तिचे रेटिंग 756 आहे. पाकिस्तानची सादिया इक्बाल दुसऱ्या, भारताची दीप्ती शर्मा तिसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाची एनाबेल सदरलँड दोन स्थानांच्या वाढीसह चौथ्या स्थानी पोहोचली आहे. भारताची रेणुका सिंग ठाकूर आणि इंग्लंडची सारा ग्लेन प्रत्येकी एका स्थानाने घसरून अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानी आल्या आहेत.
इंग्लंडची चार्ली डीन आणि पाकिस्तानची नश्ररा संधू प्रत्येकी तीन स्थानांच्या फायदेशीर बदलासह सातव्या आणि आठव्या क्रमांकावर पोहोचल्या आहेत. ऑस्ट्रेलियाची जॉर्जिया वैरहॅम एका स्थानाच्या घसरणीसह नवव्या स्थानी तर वेस्ट इंडीजची ऐफी फ्लेचर दोन स्थानांच्या फायद्यासह 10व्या स्थानी पोहोचली आहे.
न्यूझीलंडची अमेलिया केर आणि ऑस्ट्रेलियाची मेगन शूट यांना प्रत्येकी चार स्थानांचे नुकसान झाले आहे. त्या अनुक्रमे 11व्या आणि 12व्या स्थानावर पोहोचल्या आहेत. भारताची राधा यादव एका स्थानाच्या वाढीसह 15व्या स्थानावर पोहोचली आहे.
महिला टी-20 ऑलराउंडर क्रमवारीच्या टॉप 10 मध्ये कोणताही बदल झालेला नाही. वेस्ट इंडीजची हेली मॅथ्यूज अजूनही पहिल्या स्थानी कायम आहे. भारताची दीप्ती शर्मा तिसऱ्या स्थानावर कायम आहे.