विंडहोक : यजमान नामिबियाने श्वास रोखून धरायला लावणाऱ्या कामगिरीचे प्रदर्शन करत, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर चार गडी राखून विजय मिळवला. ‘आयसीसी’च्या पूर्ण सदस्य संघाविरुद्धचा हा त्यांचा पहिलाच ऐतिहासिक विजय ठरला आहे.
येथील नामिबिया क्रिकेट ग्राऊंडवर आपल्या घरच्या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळताना नामिबियाच्या संघाने प्रोटीज संघाला 8 बाद 134 धावांवर रोखले. त्यानंतर, यजमान संघाने डावाच्या शेवटच्या चेंडूवर संघर्षपूर्ण विजय मिळवला. आश्चर्य म्हणजे ‘आयसीसी’चा सहयोगी सदस्य असलेल्या नामिबियाने यापूर्वी कोणत्याही स्वरूपातील हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता.
क्विंटन डी कॉक आणि रिझा हेंड्रिक्ससारख्या अनुभवी फलंदाजांच्या उपस्थितीनंतरही दक्षिण आफ्रिकेची अवस्था एकवेळेस 5 बाद 68 अशी होती. त्यानंतर, जेसन स्मिथने 31 चेंडूंत 30 धावांची खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. नामिबियाकडून 27 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज रुबेन ट्रम्पेलमनने 28 धावांत 3 बळी घेतले.
प्रत्युत्तरात, नामिबियाच्या आघाडीच्या फळीलाही सुरुवातीलाच धक्के बसले आणि यजमान संघाची अवस्था 4 बाद 66 अशी झाली होती. मात्र, त्यानंतर अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज झेन एडवर्ड ग्रीनने 23 चेंडूंत नाबाद 30 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला साथ देत रुबेन ट्रम्पेलमनने 8 चेंडूत 11 धावा करत संघाला शेवटच्या चेंडूवर 6 बाद 138 धावांसह ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
दक्षिण आफ्रिका : 20 षटकांत 8 बाद 134. (जेसन स्मिथ 31, प्रिटोरियस 22. रुबेन 3/28).
नामिबिया : 20 षटकांत 6 बाद 138. (झेन ग्रीन नाबाद 30, गेरहार्ड 21. नँद्रे, सिमेलेन प्रत्येकी 2 बळी).