टी -20 विश्वचषक स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना गुरुवार, २७ जून रोजी भारत आणि गतविजेता इंग्लंडमध्ये होणार आहे. गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार्या सामन्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. गत विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडकडून झालेल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. मात्र या सामन्यावर पावसाचे ढग आहेत. गयाना येथे पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पावसामुळे हा सामना रद्द झाला तर या सामन्याचा निकाल कसा असेल याबाबत जाणून घेवूया...
ICC टी-20 विश्वचषक स्पर्धा २०२४ मध्ये दुसरा उपांत्य (सेमी फायनल) सामना गुरुवार, २७ जूनला भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजल्यापासून गयाना येथील प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल.
2022 टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मैदानात उतरणारी टीम इंडियाला हा हिशेब चुकता करायची संधी आहे. मात्र या सामन्यापूर्वीचा हवामान अंदाज क्रिकेट चाहत्यांचा मूड खराब करणार आहे. गयाना येथे पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागानुसार, २७ जून रोजी गयानामध्ये सकाळी पावसाची ७० टक्के शक्यता आहे. सामन्याच्या दिवशी पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड सेमी फायनल सामन्याला पावसाचा फटका बसला तर दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण दिला जाणार आहे. त्यामुळे सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असणार्या टीम इंडियाला त्याचा फायदा होणार असून, पावसामुळे सामना रद्द झाला तर भारतीय संघ थेट फायनलमध्ये धडक मारणार आहे.