T20 World Cup
टी-20 वर्ल्डकपमध्ये द. आफ्रिकेने आतापर्यंत सलग 6 विजय मिळवले आहेत. Image Twitter
स्पोर्ट्स

T20 World Cup : सलग 6 विजयानंतरही द. आफ्रिकेला उपांत्य फेरी गाठणे अवघड

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup : टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत वेस्ट इंडीजने अमेरिकेवर 9 विकेट राखून एकतर्फी विजय मिळवला. यासह ग्रुप 2 साठी उपांत्य फेरीच्या शर्यतीत चुरस निर्माण झाली आहे. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिज संघासमोर 129 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी अवघ्या 65 चेंडूत पूर्ण गाठले. या मोठ्या विजयासह, विंडिजने नेट रनरेटमध्ये लक्षणीय सुधारणा केली आहे जो आता 1.814 वर पोहोचला आहे.

द. आफ्रिका अपराजित

  • द. आफ्रिकेचा संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला आहे.

  • अशा परिस्थितीत वेस्ट इंडिजने अमेरिकेवर एकतर्फी विजय मिळवला.

  • यासह सुपर 8 फेरीच्या ग्रुप 2 मध्ये सुरस निर्माण झाली आहे.

  • द. आफ्रिकेचे 4 गुण झाले असले तरी नेट रनरेटमध्ये ते मागे आहेत.

वेस्ट इंडिजला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. पण अमेरिकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवून त्यांनी नेट रनरेटमध्ये सुधारणा तर केलीच पण आता द. आफ्रिकेच्या संघासमोरही अडचणी निर्माण केल्या आहेत. द. आफ्रिकेचा संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला आहे. त्यांनी खेळलेले सर्व 6 सामने जिंकले आहेत.

तिन्ही संघांचा नेट रन रेट

दक्षिण आफ्रिका : +0.625 (4 गुण)

वेस्ट इंडिज : +1.814 (2 गुण)

इंग्लंड : +0.412 (2 गुण)

2007 ची पुनरावृत्ती होणार?

द. आफ्रिका सध्या सुपर 8 फेरीत 4 गुण मिळवून गट 2 मध्ये पहिल्या स्थानावर आहे. पण त्यांचा नेट रनरेट 0.625 आहे. या गटात सध्या इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचे प्रत्येकी 2 गुण आहेत. अशा परिस्थितीत आफ्रिकन संघाला त्यांच्या शेवटच्या सामन्यात विजयाची नोंद करणे आवश्यक आहे. सुपर 8 मध्ये इंग्लंडला शेवटचा सामना अमेरिकेविरुद्ध आहे. जर त्यांनी विजय मिळवला तर उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान निश्चित होईल. वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका यांच्यातील सामना बाद फेरीसारखा असेल. जर आफ्रिकन संघ या सामन्यात हरला तर त्यांचा या टी-20 विश्वचषकातील प्रवास संपुष्टात येईल.

2007 च्या टी-20 विश्वचषकात द. आफ्रिकेच्या संघासोबत अशीच परिस्थिती झाली होती. त्यावेळी टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यात द. आफ्रिकेचा पराभव झाल्यामुळे त्यांचा नेट रन रेट खूपच खराब झाला होता आणि त्यांना उपांत्य फेरीपर्यंतही मजल मारता आली नव्हती. त्या विश्वचषक स्पर्धेच्या गट टप्प्यात द. आफ्रिका संघ अजिंक्य राहिला होता. त्यानंतर सुपर 8 फेरीत त्यांनी इंग्लंड आणि न्यूझीलंडला पराभूत केले. पण भारताविरुद्ध 37 धावांनी पराभव झाल्यानंतर ते स्पर्धेतून बाहेर पडले होते.

शिल्लक सामने

  • इंग्लंड विरुद्ध अमेरिका : 23 जून, सेंट लुसियाच्या मैदान (भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता)

  • वेस्ट इंडिज विरुद्ध द. आफ्रिका : 24 जून, किंग्सटाउन मैदान (भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता)

SCROLL FOR NEXT