पुढारी ऑनलाईन डेस्क : Rashid Khan T20WC : सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चार संघांनी आपले स्थान निश्चित केले आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, भारत, आणि अफगाणिस्तानया संघांनी सुपर 8 मध्ये अप्रतिम कामगिरी करत अंतिम चारमध्ये प्रवेश केला. या चार संघांमध्ये अफगाणिस्तानने तमाम क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. त्यांच्या गटातील सर्वात धोकादायक संघ असलेल्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. त्यानंतर अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाण संघाने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, या संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाची मदत मिळाली, यासाठी राशिद खानने अप्रत्यक्षपणे रोहित शर्माचे आभार मानले आहेत. त्याची पोस्ट व्हायरल झाली आहे.
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाण संघाची चमकदार कामगिरी झाली.
अफगाणिस्तानने तमाम क्रिकेटप्रेमींची मने जिंकली.
संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाची मदत मिळाली.
वास्तविक, राशिद खानने (Rashid Khan) त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर रोहित शर्मासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोन्ही दिग्गज खेळाडू आनंदाने हसताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये राशिद खानने लिहिलंय की, ‘बम्बई से आया मेरा दोस्त.. सेमीफायनल.’
आयपीएलच्या दिवसांतही राशिद खान आणि भारतीय खेळाडूंमधली मैत्रीपूर्ण संबध पाहायला मिळतात. म्हणूनच राशिद खानने रोहित शर्माबद्दल ही खास पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या मैत्रीचे प्रेम जगासमोर व्यक्त केले आहे. रशीद खानच्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक कमेंट्सही केल्या, ज्यामध्ये एका चाहत्याने म्हलंय की दोस्ती, मैत्री आणि बंधुता, तर दुस-या एका दर्शकाने पिक ऑफ द डे म्हणून उमपा दिली आहे.
टी-20 विश्वचषकाच्या नवव्या आवृत्तीत अफगाणिस्तानने ग्रुप स्टेज आणि सुपर 8 मध्ये चांगली कामगिरी केली. ज्याच्या जोरावर या संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. परंतु अंतिम चारमध्ये पोहोचण्यात टीम इंडियाचेही काहीसे योगदान राहिले. अफगाणिस्तान-बांगलादेश सामन्यापूर्वी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महत्त्वाचा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात रोहित शर्माने 92 धावांची स्फोटक खेळी खेळली आणि भारताची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग ऑस्ट्रेलियाला करता आला नाही आणि त्यांनी सामना गमावला. ज्यानंतर कांगारूंच्या उपांत्य फेरीच्या आशा बांगलादेशच्या विजयावर अवलंबून होत्या पण अफगाणिस्तानने हे होऊ दिले नाही.
उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी तर दक्षिण आफ्रिकेचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. हे दोन्ही सामने 27 जून रोजी भारतीय वेळेनुसार अनुक्रमे रात्री 8 आणि सकाळी 6 वाजता होणार आहेत.