स्पोर्ट्स

T20 World Cup : सुपर ओव्हरचा थरार, नामिबियाचा ओमानवर विजय

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अवघ्‍या क्रिकेट जगताचे लक्ष वेधलेल्‍या टी-२० विश्वचषक स्‍पर्धेची धमाकेदार सुरुवात झाली आहे या स्‍पर्धेतील तिसर्‍याच सामन्‍याचा निकाल सुपर ओव्हरमध्‍ये लागला. डेव्हिड व्हिसीच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर नामिबियाने टी-२० विश्वचषकात सुपर ओव्हरमध्ये ओमानचा पराभव केला.

ओमानचे नामिबियाला ११० धावांचे लक्ष्‍य, सामना बरोबरीत

ओमानने प्रथम फलंदाजी करताना 109 धावा केल्या होत्या, परंतु नामिबियाचा संघ 20 षटकांनंतर 6 बाद 109 धावापर्यंतच मजल मारु शकला. नामिबियाकडून रुबेन ट्रम्पेलमनने चार विकेट घेतल्या, तर विसीने तीन आणि नंतर सुपर ओव्हरमध्ये एक विकेट घेतली. नामिबियासाठी जॅन फ्रीलिंकने सर्वाधिक ४५ धावा केल्या, पण त्याचे अर्धशतक हुकले. लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाने संथ फलंदाजी केली, त्याचा फटका त्यांना सहन करावा लागला.

सुपर ओव्हरमध्‍ये डेव्हिड व्हिसीची दमदार कामगिरी

नामिबिया आणि ओमान यांच्यातील सामना 20 षटकांनंतर बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरद्वारे निकाल लावण्यात आला. डेव्हिड व्हिसीने सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसह गोलंदाजीत दमदार कामगिरी केली. व्हिसीने कर्णधार इरास्मससह सहा चेंडूत २१ धावा केल्या. ओमानला विजयासाठी सहा चेंडूत 22 धावांजी गरज होती. गोलंदाजीतही कर्णधाराने व्‍हिसीवर विश्‍वास दाखवला. तो सार्थ ठरवत त्‍याने 10 धावा देत एक विकेट घेत नामिबियाच्‍या विजयावर शिक्‍कामोर्तब केले.

SCROLL FOR NEXT