T20 World Cup 2024 India vs Australia
आज भारत-ऑस्ट्रेलिया सामना file photo
स्पोर्ट्स

अंतिम उद्दिष्टासाठी सराव सामना

पुढारी वृत्तसेवा

निमिष पाटगावकर

भारताने अँटिगाला बांगला देशचा दणदणीत पराभव करून दोन विजयांसह आपल्या उपांत्य फेरीच्या प्रवेशाच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे, तर दुसरीकडे अफगाणिस्तानने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करून आपल्या गटात खळबळ उडवून दिली आहे. अफगाणिस्तानच्या या विजयामुळे आजचा भारत-ऑस्ट्रेलिया सामना हा भारतापेक्षा जास्त ऑस्ट्रेलियाच्या जीवन मरणाचा झाला आहे.

भारताने आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकला, तर ऑस्ट्रेलिया बाहेर जायच्या मार्गावर असेल. जर आज ऑस्ट्रेलिया जिंकली, तर अफगाणिस्तानला उपांत्य फेरी गाठायला बांगला देशला मोठ्या फरकाने हरवावे लागेल. असे जर झाले तर भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांचे प्रत्येकी दोन विजय होऊन रनरेटला महत्त्व येईल. अजून एक शक्यता म्हणजे आज ऑस्ट्रेलिया हरले आणि अफगाणिस्तान बांगला देशविरुद्ध हरले, तर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघांचे एकेक विजय असल्याने नेट रनरेट वर गणित असेल. आज भारताचा नेट रनरेट २.४२५ असल्याने या सर्व शक्यतात भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग अजूनही अनिश्चित वाटतो. भारताला आज ऑस्ट्रेलियाला हरवून त्यांचा काटा उपांत्य फेरीआधीच काढायची नामी संधी आहे.

'अँटिगा'वरील वाऱ्याच्या वेगाचा योग्य फायदा घेणे गरजेचे

भारताची या सामन्यासाठी रणनीती ही आपला पुढचा मार्ग कसा सुकर करता येईल, यादृष्टीने असली पाहिजे. आपले सुपर-८ चे दोन्ही सामने जिंकताना आपल्या फलंदाजांना सूर गवसतोय ही समाधानाची बाब आहे. बांगला देशविरुद्धच्या सामन्याला आपण अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेलाच संघ अपेक्षेप्रमाणे उतरवला. अँटिगाचे हे नवे स्टेडियम शहराबाहेर आहे आणि इथे वाऱ्याच्या वेगाचा योग्य फायदा करून घेणे गरजेचे असते. या सामन्यासाठी नवी खेळपट्टी वापरली जाणार होती. बांगला देशने या रोहित शर्मा आणि कोहली दोघांना गोलंदाजांचा वेग वापरून पॉवर प्लेमध्ये धावा काढायला मिळू नये म्हणून दोन्ही बाजूंनी त्यांनी फिरकीने सुरुवात केली. भारताचा या विश्वचषकातला दृष्टिकोण धोके पत्करून धावा करण्याचा आहे. यामुळे गोलंदाजांवर पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्यात रोहित शर्माने शाकिबवर हल्ला चढवला आणि त्यात त्याचा बळी गेला. भारताकडे ८ फलंदाज असताना त्यांनी पारंपरिक पद्धतीने न खेळता प्रत्येक चेंडूवर हल्ला करून गोलंदाजांना डोके वर न काढू देणे हेच अपेक्षित आहे. तंजीम हा बांगला देशचा एकमेव गोलंदाज होता ज्याने भारतीयांवर वचक ठेवला. दुर्दैवाने त्याला दुसऱ्या बाजूने साथ कुणाची मिळाली नाही. कोहलीला आणि सूर्याला लागोपाठ बाद करून त्याने भारताला अडचणीत आणायचा प्रयत्न केला. ऋषभ पंत आणि पंड्या यांच्या मुक्त फटकेबाजीने भारताला दोनशेच्या जवळ पोहोचवले. बांगला देशची फलंदाजी हे आव्हान पेलायला समर्थ नव्हती हे खुद्द त्यांनाही माहीत होते. तेव्हा लिट्टन दास, तांजीद आणि शांटोचा थोडाफार प्रतिकार वगळता भारताला विजयास अडचण आली नाही.

कोहलीच सलामीला!

आतापर्यंत भारताचे सामने अफगाणिस्तान आणि बांगला देश संघाबरोबर झाले आहेत, ज्यांनी भारतासारख्या बलाढ्य देशाकडून पराभव गृहीत धरल्यासारखा खेळ केला; पण आता भारताचे लक्ष्य हे 'आयसीसी' चषक उंचावणे असेल, तर भारतीयांना आपला खेळ त्या अंतिम उद्दिष्टासाठी उंचावायला अजून काय काय करता येईल, याचा अभ्यास या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून करायचा आहे. कोहलीच सलामीला असेल हे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी स्पष्ट केल्यावर यशस्वी जैस्वालचा मार्ग बंद झाला आहे, असेच म्हणावे लागेल. कोहलीच्या अफगाणिस्तान आणि बांगला देश विरुद्धच्या फलंदाजीने त्याचा फॉर्म पुन्हा गवसलेला दिसतो. रोहित शर्मा त्याच्या आक्रमणाच्या रोलप्रमाणे खेळत आहे; पण तो जर पूर्ण पॉवर प्ले टिकला, तर भारताची धावसंख्या कमीत कमी वीस-पंचवीस धावांनी वाढेल. ऋषभ पंत आपली तिसऱ्या क्रमांकाची भूमिका उत्तम जगत आहे; पण त्याने लागोपाठ दोनदा रिव्हर्स स्वीपचा फटका खेळताना आपली विकेट गमावल्याने त्याची फटक्यांची निवड त्याला सुधारावी लागेल. शिवम दुबेचे संघातील स्थान अबाधित आहे, हा संदेश त्याला मिळाल्यावर त्याने जास्त खुलून खेळायला पाहिजे. पहिला पॉवर प्ले झाल्यानंतर दुबे मैदानात उतरत असेल, तर त्याचे काम एक बाजूने आक्रमण करण्याचे आहे. बांगला देशविरुद्ध त्याने १४१ च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या. दुबेचे काम हे गोलंदाजांची लय बिघडवणे आहे. भारताला या खेळपट्ट्यांवर दोनशेच्या वर धावा काढायच्या असतील, तर या मधल्या षटकात धावांचा वेग वाढवणे गरजेचे आहे.

२०११ पासून उपांत्य आणि अंतिम सामन्यांचा दगा

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात आपण दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये ७९ धावा काढल्या, तर बांगला देशविरुद्ध ८१ धावा काढल्या. हे प्रमाण जर अजून वीस धावांनी वाढवायचे असेल, तर शिवम दुबेने धोका पत्करून टोलेबाजी करणे गरजेचे आहे. हार्दिक पंड्याने या विश्वचषकात संघाच्या गरजेनुसार अत्यंत महत्त्वाच्या भूमिका बजावत आपल्या विजयात हातभार लावला आहे. भारतीय संघ अडचणीत सापडत आहे, असे वाटताना त्याच्या फलंदाजीने तर मोक्याच्या क्षणी बळी मिळवत त्याच्या गोलंदाजीने आपल्याला तारले आहे. रवींद्र जडेजाचे अष्टपैलूत्व निर्विवाद आहे; पण भारताच्या आतापर्यंतच्या कामगिरीत त्याला आपले कर्तृत्व दाखवायला वाव मिळाला नाही. या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याला पंड्याच्या जागी बढती देऊन त्याला सराव देण्याचा विचार आपण करू शकतो. भारताची या विश्वचषकातील वाटचाल ही अजेय अशी आहे. भारताला विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणे कठीण नाही हे आपण पुन्हा एकदा बघितले आहे. उपांत्य आणि अंतिम हे दोनच सामने २०११ पासून आपल्याला दगा देत आहेत. साधारण सराव सामना हा दुबळ्या संघाविरुद्ध असतो पण आजच्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्याने आपल्या अंतिम उद्दिष्टासाठी उत्तम संघाविरूद्ध सराव करायची उत्तम संधी आहे.

SCROLL FOR NEXT