लंडन : पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी इंग्लंडच्या अडचणीत वाढ झाली आहे. इंग्लंडचे मुख्य फिरकी गोलंदाज आदिल रशीद आणि रेहान अहमद यांना भारत सरकारने अद्याप व्हिसा मंजूर केलेला नाही, असे वृत्त द गार्डियनने दिले आहे. दोन्ही खेळाडूंचे मूळ पाकिस्तानात असल्यामुळे हा विलंब होत असल्याचे समजते. यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेत आणि त्यानंतरच्या विश्वचषक तयारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
या विलंबामुळे आदिल रशीद आणि रेहान अहमद हे दोन्ही खेळाडू या आठवड्यात आपल्या संघासोबत श्रीलंकेला जाऊ शकणार नाहीत. इंग्लंडचा संघ श्रीलंकेत 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे. आदिल रशीद सध्या दक्षिण आफ्रिकेतील एसए टी-20 लीगमध्ये खेळत आहे, तर रेहान अहमद ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळत आहे.
व्हिसा मिळाल्यास ते तिथूनच थेट संघात सामील होतील, अशी आशा आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (इसीबी) या प्रकरणावर यूके सरकारची मदत मागितली आहे. अर्जांवर कोणताही आक्षेप नसल्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी व्हिसा कधी मिळणार हे अद्याप अस्पष्ट आहे.
रशीद आणि अहमद उपलब्ध नसल्यास, सध्या संघात लियम डॉसन हा एकमेव अव्वल फिरकीपटू उरला आहे. यामुळे विल जॅक्स आणि जेकब बेथेल या खेळाडूंना अधिक षटके टाकावी लागण्याची शक्यता आहे. इंग्लंडची विश्वचषक मोहीम 8 फेब्रुवारीला मुंबईत नेपाळविरुद्ध सुरू होणार आहे.