स्पोर्ट्स

Controversy : पाकिस्तानी खेळाडूचे नीच कृत्य; टी-२० विश्वचषकादरम्यान हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याची छेडछाड

T20 World Cup : पीडित महिलेने आरडाओरडा करत मदतीसाठी टाहो फोडला, त्यानंतर हॉटेलमधील कर्मचारी तातडीने तिच्या मदतीला धावून आले.

रणजित गायकवाड

T20 World Cup Controversy Pak Cricketer Harassing Female Hotel Staff

कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ मधील पाकिस्तानचा प्रवास सुपर-८ फेरीतच संपुष्टात आला. मात्र, आता या संघाबाबत एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. श्रीलंका येथे स्पर्धा सुरू असताना, पाकिस्तानी संघातील एका खेळाडूने हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याची छेडछाड केल्याचे वृत्त समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

या विश्वचषकात पाकिस्तानी संघ किमान उपांत्य फेरीपर्यंत मजल मारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, मैदानावरील त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली आणि सुपर-८ मध्येच त्यांचे आव्हान संपुष्टात आले. मायदेशी परतल्यानंतर पीसीबीने (PCB) खराब कामगिरीबद्दल खेळाडूंना दंड ठोठावला असला, तरी आता समोर आलेल्या या लाजिरवाण्या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला आहे.

स्पर्धेदरम्यान पाकिस्तानी संघ श्रीलंकेतील कँडी येथील 'गोल्डन क्राउन' हॉटेलमध्ये वास्तव्यास होता, तिथेच एका खेळाडूने हॉटेल कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे.

महिलेने मदतीसाठी फोडला टाहो

पाकिस्तानी संघाने विश्वचषकातील आपले सर्व सामने कोलंबो आणि कँडी येथे खेळले. सुपर-८ फेरीतील त्यांचे शेवटचे दोन सामने कँडीच्या पल्लेकेले स्टेडियमवर झाले. 'टेलीकॉम एशिया स्पोर्ट'च्या अहवालानुसार, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या एका खेळाडूने हाऊसकीपिंग विभागातील महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केले. यावेळी पीडित महिलेने आरडाओरडा करत मदतीसाठी टाहो फोडला, त्यानंतर हॉटेलमधील कर्मचारी तातडीने तिच्या मदतीला धावून आले.

व्यवस्थापक नावीद चीमा यांची मध्यस्थी

या घटनेनंतर पाकिस्तानी संघाचे व्यवस्थापक नावीद चीमा यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी खेळाडूच्या या कृत्याबद्दल हॉटेल व्यवस्थापनाची माफी मागितली आणि संबंधित खेळाडूला दंडही ठोठावला. या प्रकरणाचा अहवाल आता सार्वजनिक झाला असला, तरी पीसीबीने अद्याप यावर अधिकृत भाष्य केलेले नाही, तसेच त्या खेळाडूचे नावही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

सुमार कामगिरीमुळे पीसीबीकडून यापूर्वीच दंड

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी सामन्यात झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तानी संघावर टीकेची झोड उठली होती. सुपर-८ फेरीत पोहोचूनही त्यांना केवळ एकच सामना जिंकता आला. न्यूझीलंडच्या तुलनेत निव्वळ धावगती कमी असल्याने त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. या खराब कामगिरीची दखल घेत पीसीबीने मायदेशी परतलेल्या प्रत्येक खेळाडूला ५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT