स्पोर्ट्स

Zimbabwe Historic Victory: झिम्बाब्वेकडून श्रीलंकेच्या सिंहांची शिकार..! 6 विकेट्सनी धूळ चारली; बेनेट-रझा ठरले विजयाचे शिल्पकार

साखळी फेरीत झिम्बाब्वे अजिंक्य, 'ग्रुप बी'मध्ये पटकावले अव्वल स्थान

रणजित गायकवाड

कोलंबो : विश्वचषकाच्या रणधुमाळीत गुरुवारी (दि. १९) क्रिकेट चाहत्यांनी पुन्हा एक मोठा उलटफेर अनुभवला. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या 'ग्रुप ब' मधील शेवटच्या साखळी सामन्यात, झिम्बाब्वेच्या झुंजार खेळाडूंनी बलाढ्य श्रीलंकेला ६ गडी राखून पराभवाची धूळ चारली. या महाविजयासह झिम्बाब्वेने साखळी फेरीत अजिंक्य राहत 'ग्रुप बी' मध्ये अव्वल स्थान काबीज केले आहे. अशाप्रकारे सुपर-८ फेरीपूर्वी झिम्बाब्वेने जगाला दाखवून दिले आहे की, त्यांना 'अंडरडॉग' समजण्याची चूक कोणत्याही संघाला महागात पडू शकते.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या श्रीलंकेची सुरुवात वादळी झाली. पथुम निसांकाने ४१ चेंडूंत ६२ धावांची अर्धशतकी खेळी साकारून लंकन डावाचा पाया रचला. त्याला कुशल परेरा (२२) आणि पवन रथनायके (४४) यांनी सुरेख साथ दिली. मात्र, झिम्बाब्वेच्या ग्रॅमी क्रेमर आणि ब्लेसिंग मुझाराबानी यांनी टिच्चून गोलंदाजी करत लंकेच्या धावगतीला लगाम घातला. क्रेमरने आपल्या फिरकीच्या जाळ्यात महत्त्वाच्या दोन फलंदाजांना अडकवून श्रीलंकेला १७८ धावांवर रोखले.

बेनेटचा संयम अन् रजाचा तडाखा

१७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ब्रायन बेनेट आणि मरुमानी यांनी ६९ धावांची दमदार सलामी दिली. १० षटकांत केवळ ७८ धावा असताना सामना श्रीलंकेच्या बाजूने झुकलेला वाटत होता, पण ११ व्या षटकानंतर मैदानावर 'सिकंदर राज' सुरू झाले. कर्णधार सिकंदर रझाने आपल्या बॅटचा तडाखा दाखवत अवघ्या २६ चेंडूंत ४५ धावा कुटल्या. रझाने मदुशंका आणि तीक्षणा यांसारख्या अनुभवी गोलंदाजांना सीमापार धाडत सामन्याचे पारडे झिम्बाब्वेच्या बाजूने झुकवले.

दुसऱ्या बाजूने ब्रायन बेनेटने खेळपट्टीवर पाय रोवून ४८ चेंडूंत नाबाद ६३ धावांची खेळी केली. बेनेटच्या या खेळीत ८ नयनरम्य चौकारांचा समावेश होता. शेवटच्या षटकांत टोनी मुनयोंगाने आपल्या छोटेखानी फटकेबाजीने विजयावर शिक्कामोर्तब केले.

लंकन गोलंदाजी हतबल

दुशान हेमंथाने २ बळी मिळवून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण इतर गोलंदाज झिम्बाब्वेच्या फलंदाजांवर दबाव टाकण्यास अपयशी ठरले. महीश तीक्षणा आणि मदुशंका यांसारख्या अनुभवी गोलंदाजांना बेनेट आणि रझाने सहज खेळून काढले. झिम्बाब्वेने १९.३ षटकांत १८२ धावांचे लक्ष्य गाठून श्रीलंकन प्रेक्षकांना शांत केले.

सुपर-८ साठी 'धोक्याची घंटा'

हा केवळ विजय नसून झिम्बाब्वेच्या क्रिकेटमधील एका नवीन युगाची नांदी आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० इतिहासातील झिम्बाब्वेचा हा दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला आहे. आता सुपर-८ फेरीत त्यांचा सामना भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांसारख्या बलाढ्य संघांशी होणार आहे. साखळी फेरीत सलग तीन विजय मिळवून झिम्बाब्वेने सुपर-८ मधील प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवली आहे.

थोडक्यात धावसंख्या

  • श्रीलंका : १७८/७ (२० षटके) - निसांका ६२, रथनायके ४४; क्रेमर २/२७

  • झिम्बाब्वे : १८२/४ (१९.३ षटके) - बेनेट ६३*, रझा ४५; हेमंथा २/३६

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT