स्पोर्ट्स

IND vs WI : ठरलं! वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघात मोठा बदल, वरुण चक्रवर्तीला डच्चू, कुलदीपचे कमबॅक

T20 World Cup 2026 Team India playing 11 : अभिषेक-सॅमसन यांची सलामी फिक्स

रणजित गायकवाड

टी-२० विश्वचषक २०२६ च्या सेमीफायनलमध्ये धडक मारण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत वेस्ट इंडिजवर विजय मिळवणे अनिवार्य आहे. 'सुपर-८' फेरीतील या निर्णायक सामन्यासाठी भारतीय संघात एका बदलाची शक्यता वर्तवण्यात येत असून, आगामी लढतीसाठी टीम इंडियाची 'प्लेइंग ११' खालीलप्रमाणे असू शकते.

भारतीय संघाचे उपांत्य फेरीतील स्थान अद्याप निश्चित नसले तरी त्यांच्या आशा पल्लवीत आहेत. मात्र, यासाठी वेस्ट इंडिजसारख्या तगड्या संघाला पराभूत करण्याचे मोठे आव्हान भारतासमोर असेल. वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजीच्या बाबतीत अत्यंत स्फोटक असून त्यांच्याकडे एकापेक्षा एक सरस फलंदाजांची फळी उपलब्ध आहे. त्यामुळे या सामन्यात भारताला आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

दोन्ही संघांसाठी 'करो या मरो'ची स्थिती

वेस्ट इंडिजचा या विश्वचषकातील आतापर्यंतचा प्रवास प्रभावी राहिला आहे. मात्र, मागील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने त्यांचा ९ गड्यांनी दणदणीत पराभव केला होता. झिम्बाब्वेविरुद्ध मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिकेला कडवी झुंज देईल अशी अपेक्षा होती, पण त्यात त्यांना अपयश आले. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचा विसर पाडून कॅरेबियन संघ पुनरागमन करण्यास उत्सुक असेल, कारण उपांत्य फेरीत पोहोचण्याची त्यांची संधीही तितकीच प्रबळ आहे.

कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता

कोलकाता येथे होणाऱ्या या महत्त्वपूर्ण सामन्यात भारताला बिनचूक कामगिरी करावी लागणार आहे. कोलकाताच्या खेळपट्टीचा विचार करता, फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीला अंतिम ११ मधून डच्चू दिला जाऊ शकतो. त्याच्या जागी 'चायनामन' कुलदीप यादवला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. कुलदीप हा असा गोलंदाज आहे जो खेळपट्टी किंवा परिस्थितीवर अवलंबून न राहता बळी मिळवण्याची क्षमता ठेवतो. दुसरीकडे, वरुण मागील दोन सामन्यांत फारसा प्रभावी ठरलेला नाही आणि त्याने धावा देखील अधिक खर्च केल्या आहेत.

संघात इतर बदलांची शक्यता कमीच आहे. रिंकू सिंह यांच्या वडिलांच्या निधनानंतर तो निवडीसाठी उपलब्ध असेल की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, तो उपलब्ध झाला तरी त्याला थेट 'प्लेइंग ११' मध्ये स्थान मिळणे कठीण वाटते. सलामीची धुरा पुन्हा एकदा अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन सांभाळतील, तर तिसऱ्या क्रमांकावर इशान किशन आणि त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजीला येईल.

मध्य फळीत झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतकी खेळी करणारा हार्दिक पंड्या पाचव्या क्रमांकावर, तर फॉर्मात असलेला तिलक वर्मा सहाव्या क्रमांकावर खेळू शकतो. सातव्या क्रमांकावर शिवम दुबे आणि आठव्या क्रमांकावर उपकर्णधार अक्षर पटेल असेल. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्यावर असेल, तर कुलदीप यादव फिरकी विभागाचे नेतृत्व करेल.

वेस्ट इंडिजविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग ११

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT