स्पोर्ट्स

Team India in Trouble : टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, 'फिनिशर' रिंकू सिंहची एक्झिट; प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठे बदल

T20 World Cup 2026 : रिंकू चेन्नईहून तातडीने घरी परतला... तो पुन्हा संघात कधी सामील होईल याबाबत अस्पष्टता

रणजित गायकवाड

चेन्नई : येत्या २६ फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या सुपर-८ फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्फोटक फिनिशर रिंकू सिंह कौटुंबिक आपत्कालीन कारणामुळे तातडीने घरी परतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिंकूच्या वडिलांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

वडिलांच्या आजारपणामुळे रिंकूचा तडकाफडकी निर्णय

रिंकू सिंहचे वडील खानचंद हे गेल्या अनेक दिवसांपासून यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बातमी मिळताच रिंकू चेन्नईहून तातडीने रवाना झाला. तो पुन्हा संघात कधी सामील होईल, याबाबत बीसीसीआयने अद्याप अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. मंगळवारी झालेल्या सराव सत्रातही तो अनुपस्थित होता.

भारतीय संघापुढील पेच

२०२६ च्या या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाची वाटचाल आता खडतर वळणावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी जिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धचे दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे.

विद्यमान स्थिती : भारताचा नेट रनरेट -3.8 आहे. त्यामुळे संघाला पुढील सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक आहे.

रिंकूचा फॉर्म : या स्पर्धेत रिंकू आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकलेला नाही. ५ डावांत त्याने अवघ्या २४ धावा केल्या आहेत. तरीही, त्याच्यासारखा 'फिनिशर' मैदानावर असणे प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर मानसिक दडपण निर्माण करते.

रिंकूच्या नसण्याने काय बदल होतील?

रिंकू सिंगच्या अनुपस्थितीमुळे भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

संजू सॅमसनला संधी : रिंकूच्या जागी मधल्या फळीत संजू सॅमसनचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे. सॅमसनकडे वेगवान धावा करण्याची क्षमता आहे.

अक्षर पटेलचे पुनरागमन : संघ संतुलन राखण्यासाठी उपकर्णधार अक्षर पटेलला पुन्हा संघात स्थान दिले जाऊ शकते, ज्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही मजबूत होतील.

फिनिशिंगची जबाबदारी : रिंकू नसल्याने आता डावाच्या शेवटी फटकेबाजी करण्याची पूर्ण जबाबदारी हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्या खांद्यावर असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT