नवी दिल्ली : पाकिस्तान सरकारने टी-२० विश्वचषकातील भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्काराची घोषणा केली असली, तरी येत्या एक-दोन दिवसांत हा निर्णय मागे घेतला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी (दि. २) सायंकाळी पाकिस्तान सरकारने 'X' वरून या खळबळजनक निर्णयाची घोषणा केली. मात्र, क्रिकेट तज्ज्ञांच्या मते ही केवळ एक 'पोकळ धमकी' असून, पाकिस्तानला याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
पाकिस्तानने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) अधिकृतपणे काहीही कळवलेले नाही. मात्र, आयसीसीने तत्काळ कठोर शब्दांत प्रतिक्रिया देत संभाव्य परिणामांचे संकेत दिले आहेत. पाकिस्तानचा हा निर्णय बांगलादेशच्या समर्थनार्थ असल्याचे मानले जात आहे.
बांगलादेशने सुरक्षेचे कारण देत आपले सामने भारतातून श्रीलंकेला हलवण्याची मागणी केली होती, जी आयसीसीने फेटाळून लावली. त्यानंतर बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेतली. मात्र, बांगलादेशचा हा निर्णय सुरक्षेपेक्षा 'अहंकारा'तून घेतला गेल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे.
पाकिस्तानने आयसीसीवर 'दुटप्पी' भूमिकेचा आरोप केला आहे. गेल्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यावर त्यांचे सामने दुबईत हलवण्यात आले होते. मात्र, या विश्वचषकातही भारताला आपले सामने श्रीलंकेत जाऊन खेळावे लागणार आहेत, जिथे पाकिस्तानला आधीच आपले सर्व सामने खेळण्याची सवलत मिळाली आहे. अशा परिस्थितीत 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नयेत', असा टोलाही लगावला जात आहे.
जर पाकिस्तान आपल्या निर्णयावर ठाम राहिला, तर त्याचे परिणाम केवळ मैदानापुरते मर्यादित राहणार नाहीत.
आर्थिक हानी : भारत-पाक सामना रद्द झाल्यास ब्रॉडकास्टर्सना सुमारे २०० ते २५० कोटी रुपयांचा फटका बसू शकतो.
गुणतालिकेत नुकसान : पाकिस्तानला त्या सामन्याचे गुण गमवावे लागतीलच, शिवाय त्यांच्या 'नेट रन रेट'वरही विपरीत परिणाम होईल.
PSL संकटात : आयसीसीकडून लागणाऱ्या आर्थिक निर्बंधांमुळे 'पाकिस्तान सुपर लीग'चे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. तसेच, भविष्यात इतर देश पाकिस्तानचा दौरा करण्यास कचरतील.
पाकिस्तानकडे सध्या आयसीसीला आव्हान देण्याइतकी ताकद नाही, हेच या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. स्वतःहून ओढवून घेतलेल्या या संकटातून सन्मानजनक मार्ग काढण्यासाठी पाकिस्तानला आपला हेका सोडावा लागेल. १५ फेब्रुवारीला कोलंबोच्या मैदानावरच या लढतीचा फैसला होणे हे क्रिकेट चाहते, आयसीसी आणि स्वतः पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) हिताचे आहे. मात्र, पाकिस्तानचे सल्लागार त्यांना योग्य सल्ला देतात की नाही, हाच खरा कळीचा प्रश्न आहे.