नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी ‘बीसीसीआय’ने अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई या पाच क्रिकेट स्थळांची निवड केली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे.
यापूर्वी 2023 वन-डे विश्वचषकाची फायनलदेखील (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया) अहमदाबाद येथेच झाली होती. एक लाखाहून अधिक प्रेक्षक क्षमता असलेले हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. यादरम्यान, पाकिस्तान संघाने अंतिम फेरीत प्रवेश केल्यास, हा अंतिम सामना श्रीलंकेत खेळवला जाईल, असेही यावेळी निश्चित करण्यात आले आहे.
पुढील आठवड्यात ‘आयसीसी’कडून फेब्रुवारी-मार्चमधील या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना 7 फेब्रुवारी रोजी होईल, तर फायनल 8 मार्च रोजी होण्याची शक्यता आहे.
या स्पर्धेचे सहआयोजन श्रीलंका करणार असून, भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या करारानुसार श्रीलंका हे पाकिस्तानसाठी तटस्थ ठिकाण असणार आहे.
श्रीलंकेतील 3 मैदानांवर सामने आयोजित केले जाणार असून, यात कँडी आणि कोलंबोचा समावेश आहे. तिसरे स्थळ अद्याप निश्चित झालेले नाही. मागील वर्षी जूनमध्ये बार्बाडोस येथे झालेल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यामुळे भारत घरच्या मैदानावर या विश्वचषकात गतविजेता म्हणून उतरेल.