Administrator
स्पोर्ट्स

इशान किशनचा धमाका! अवघ्या २० चेंडूत ठोकले अर्धशतक; मोडला धोनीचा ऐतिहासिक विक्रम

Ishan Kishan fastest fifty India : इशान किशनने नामिबियाविरुद्ध २४ चेंडूत ६१ धावांची स्फोटक खेळी केली,

रणजित गायकवाड

नवी दिल्ली : भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज इशान किशनने नामिबियाविरुद्धच्या सामन्यात आपल्या बॅटने मैदानात आग लावली. त्याने केवळ २० चेंडूत वादळी अर्धशतक पूर्ण करत टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय यष्टिरक्षक म्हणून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या खेळीसह त्याने माजी कर्णधार एम.एस. धोनीचा कित्येक वर्षांचा विक्रम मोडीत काढला.

धोनीचा 'तो' विक्रम आता इशानच्या नावे

इशान किशनने नामिबियाविरुद्ध २४ चेंडूत ६१ धावांची स्फोटक खेळी केली, ज्यामध्ये ६ चौकार आणि ५ गगनभेदी षटकारांचा समावेश होता. टी-२० विश्वचषकात भारतीय यष्टिरक्षक फलंदाजाद्वारे ही आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी ठरली आहे. यापूर्वी २००७ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एम.एस. धोनीने ४५ धावा केल्या होत्या. तब्बल १९ वर्षांनंतर इशानने हा आकडा पार करून अव्वल स्थान पटकावले आहे.

टी-२० विश्वचषकात भारतीय यष्टिरक्षकाची सर्वोत्तम धावसंख्या:

  • ६१ धावा: इशान किशन विरुद्ध नामिबिया (२०२६)

  • ४५ धावा: एम.एस. धोनी विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२००७)

  • ४२ धावा: ऋषभ पंत विरुद्ध पाकिस्तान (२०२४)

  • ३९ धावा: ऋषभ पंत विरुद्ध पाकिस्तान (२०२१)

युवराज, रैना आणि हार्दिकच्या पंक्तीत स्थान

इशानने केवळ धावांचा डोंगरच रचला नाही, तर षटकारांच्या बाबतीतही दिग्गज भारतीय फलंदाजांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. एकाच डावात ५ षटकार ठोकल्यामुळे तो आता युवराज सिंह, सुरेश रैना आणि हार्दिक पंड्या यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ षटकार ठोकणारा रोहित शर्मा अजूनही अग्रस्थानी आहे.

एका टी-२० विश्वचषक सामन्यात भारतासाठी सर्वाधिक षटकार:

  • ८ षटकार: रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०२४)

  • ७ षटकार: युवराज सिंह विरुद्ध इंग्लंड (२००७)

  • ६ षटकार: रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०१०)

  • ५ षटकार: इशान किशन विरुद्ध नामिबिया (२०२६) (युवराज सिंह, सुरेश रैना आणि हार्दिक पंड्या यांनीही ५-५ षटकार मारले आहेत.)

इशानच्या या तुफानी खेळीमुळे भारताने नामिबियासमोर धावांचे डोंगरासारखे आव्हान उभे केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT