स्पोर्ट्स

Team India Ducks : 0, 0, 0, 0, 0.... टीम इंडियाचे ११ ‘भोपळे’! भारतापेक्षा इटली-ओमानचे फलंदाज खाते उघडण्यात पटाईत

T20 World Cup 2026 : जगातील पहिल्या क्रमांकाचा टी-२० संघ असलेल्या भारताचे खेळाडू या स्पर्धेत तब्बल ११ वेळा खाते न उघडता (डक) तंबूत परतले आहेत.

रणजित गायकवाड

अहमदाबाद : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने आपल्या खराब कामगिरीने नीचांक गाठला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत केवळ एकच सामना गमावला असला तरी, संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक वेळा ‘शून्यावर’ बाद होण्याचा नकोसा विक्रम भारतीय खेळाडूंनी आपल्या नावावर केला आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताला ७६ धावांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या १११ धावांत गारद झाला. या पराभवाच्या नामुष्कीसोबतच भारतीय संघाने एका लाजीरवाण्या विक्रमाची भर घातली आहे. या विश्वचषकात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या संघांच्या यादीत भारत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

भारतीय फलंदाजांचे ११ भोपळे

जगातील पहिल्या क्रमांकाचा टी-२० संघ असलेल्या भारताचे खेळाडू या स्पर्धेत तब्बल ११ वेळा खाते न उघडता (डक) तंबूत परतले आहेत. यामध्ये दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे.

  • अभिषेक शर्मा : सर्वाधिक ३ वेळा शून्यावर बाद.

  • अक्षर पटेल : २ वेळा खाते उघडण्यात अपयशी.

  • इतर खेळाडू : शिवम दुबे, ईशान किशन, हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंह आणि जसप्रीत बुमराह हे प्रत्येकी १ वेळा शून्यावर बाद झाले आहेत.

इटली आणि ओमानलाही टाकले मागे

शून्यावर बाद होण्याच्या या अनपेक्षित शर्यतीत टीम इंडियाने इटली आणि ओमानसारख्या दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघांनाही मागे टाकले आहे. इटलीचे खेळाडू ८ वेळा, तर ओमानचे खेळाडू ७ वेळा शून्यावर बाद झाले होते. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे खेळाडू ६ वेळा डकवर बाद झाले आहेत.

अहमदाबादमध्ये दाणादाण; सेमीफायनलचा मार्ग खडतर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजीचे पितळ उघडे पडले. या महत्त्वपूर्ण सामन्यात ईशान किशन, रिंकू सिंह आणि जसप्रीत बुमराह हे तिघेही भोपळा न फोडता बाद झाले. केवळ १११ धावांवर संघ मर्यादित राहिल्याने भारताच्या 'नेट रनरेट'वर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला आहे.

आता सेमीफायनलचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धचे पुढील दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकणे अनिवार्य आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने जर त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकले, तर रनरेटचे समीकरण सुटून भारत आणि दक्षिण आफ्रिका पुढील फेरीसाठी पात्र ठरू शकतात. मात्र, एकाही पराभवामुळे टीम इंडियाचे स्पर्धेतील अस्तित्व धोक्यात येऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT