स्पोर्ट्स

IND vs NAM : दुस-या सामन्यातून अभिषेक शर्मा बाहेर, सॅमसनला संधी! बुमराहसाठी सिराजला डच्चू, भारताची संभाव्य 'प्लेइंग ११'

T20 World Cup India probable playing XI : गंभीर यांच्या घरी आयोजित 'डिनर पार्टी'तून अभिषेक अस्वास्थ्यामुळे लवकर बाहेर पडला होता.

रणजित गायकवाड

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२६ मधील नामिबियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय गोटातून चिंतेची बातमी समोर येत आहे. सलामीवीर अभिषेक शर्माच्या फिटनेसवर सध्या टांगती तलवार असून, त्याच्या खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या 'डिनर पार्टी'मधूनही अभिषेक प्रकृती अस्वास्थ्यामुळे लवकर बाहेर पडला होता. या पार्श्वभूमीवर, AI निवडलेल्या संभाव्य संघातही त्याच्या समावेशाबाबत अनिश्चितता वर्तवण्यात आली आहे.

फलंदाजीचे अपयश आणि फिटनेसचा पेच

भारतीय संघाने अमेरिकेविरुद्ध विजय मिळवून विश्वचषकाची दणक्यात सुरुवात केली असली, तरी भारताची ताकद मानली जाणारी फलंदाजी या सामन्यात ढेपाळलेली दिसली. स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. त्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठीही मैदानात उतरला नाही; त्याच्या जागी संजू सॅमसन क्षेत्ररक्षण करताना दिसला होता.

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनीही अभिषेकची प्रकृती ठीक नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याला पोटाचा विकार जडल्याचे समजते. दरम्यान, पहिल्या सामन्यातून बाहेर असलेला जसप्रीत बुमराह आता तंदुरुस्त झाला असला, तरी अभिषेकच्या फिटनेसबाबत अद्याप अधिकृत अपडेट मिळालेली नाही.

सॅमसनला मिळणार संधी?

येत्या १२ फेब्रुवारी रोजी नामिबियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी अभिषेक पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्यास संजू सॅमसनचे नशीब उघडू शकते. अशा स्थितीत संजू इशान किशनसोबत सलामीला येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, बुमराहच्या पुनरागमनामुळे अंतिम अकरामध्ये कोणाला स्थान द्यायचे, हा पेच कर्णधार सूर्यासमोर असणार आहे. अमेरिकेविरुद्ध शानदार कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंग किंवा मोहम्मद सिराज यांपैकी एकाला बुमराहसाठी जागा रिकामी करावी लागू शकते.

AI (गुगल जेमिनी आणि चॅट जीपीटी) ने निवडलेला संभाव्य संघ

दोन्ही एआय प्लॅटफॉर्मने सिराजला प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवले असून अर्शदीपला पसंती दिली आहे. तसेच, अभिषेकच्या फिटनेसवर चॅट जीपीटीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Google Gemini नुसार संभाव्य प्लेइंग ११

अभिषेक शर्मा/संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, शिवम दुबे/वाशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल (उपकर्णधार), अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

ChatGPT नुसार संभाव्य प्लेइंग ११

अभिषेक शर्मा/संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती/कुलदीप यादव.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT