स्पोर्ट्स

T20 World Cup 2026 : ५१ वर्षांत प्रथमच घडणार असा 'अनर्थ'? भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेसमोर मोठे संकट

T20 World Cup : भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या तिन्ही आशियाई बलाढ्य संघांचा उपांत्य फेरीतील प्रवेश कमालीचा कठीण झाला आहे.

रणजित गायकवाड

T20 World Cup India Pakistan & Sri Lanka Face Semifinal Exit After 51 Years

मुंबई : टी-२० विश्वचषक २०२६ मधील उपांत्य फेरीची शर्यत आता अत्यंत अटीतटीच्या वळणावर आली आहे. विशेष म्हणजे, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या तिन्ही आशियाई बलाढ्य संघांचा उपांत्य फेरीतील प्रवेश कमालीचा कठीण झाला आहे.

इंग्लंडने पाकिस्तानवर मिळवलेल्या रोमहर्षक विजयाने स्पर्धेत अशी काही खळबळ उडवून दिली आहे, ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल. सध्याची समीकरणे पाहता, पुरुष विश्वचषकाच्या (एकदिवसीय आणि टी-२०) ५१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच उपांत्य फेरीत भारत, पाकिस्तान किंवा श्रीलंका यांपैकी एकही संघ नसेल, अशी भीती निर्माण झाली आहे. जर असे घडले, तर हा एक नकोसा इतिहास ठरेल; विशेषतः जेव्हा ही स्पर्धा भारतीय उपखंडातच खेळवली जात आहे.

पाच दशकांचे वर्चस्व धोक्यात

गेल्या पाच दशकांमध्ये एकदिवसीय आणि टी-२० विश्वचषक मिळून एकूण २३ स्पर्धा पार पडल्या आहेत. या काळात भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या आशियाई त्रिकुटाने सातत्याने बाद फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. या तिन्ही देशांनी मिळून आतापर्यंत आठ विश्वविजेतेपदे भूषवली आहेत.

  • भारत : ४ विजेतेपदे (२ एकदिवसीय, २ टी-२०) आणि १३ वेळा उपांत्य फेरी.

  • पाकिस्तान : १३ वेळा उपांत्य फेरी गाठली.

  • श्रीलंका : १३ वेळा उपांत्य फेरीत धडक.

१९७५ च्या पहिल्या पुरुष विश्वचषकानंतर आजवर प्रत्येक आवृत्तीत या तिन्हीपैकी किमान एक संघ उपांत्य फेरीत दिसायचाच. मात्र, २०२६ च्या सुपर-८ टप्प्यात ही समीकरणे पूर्णपणे आशियाई संघांच्या विरोधात जाताना दिसत आहेत.

टीम इंडियाची खडतर वाटचाल

गट-१ मध्ये भारतीय संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मोठ्या पराभवामुळे भारताच्या 'नेट रन रेट'ला मोठा फटका बसला आहे. त्यातच वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेवर १०७ धावांनी मिळवलेल्या दणदणीत विजयामुळे भारताची कोंडी झाली आहे. आता भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी वेगवेगळ्या समीकरणांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

  • २६ फेब्रुवारीला चेन्नईत झिम्बाब्वेचा मोठ्या फरकाने पराभव करणे.

  • १ मार्चला कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्ध मोठा विजय मिळवणे.

  • दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करावा, अशी प्रार्थना करणे.

गट-२ मध्ये आशियाई संघांवर टांगती तलवार

गट-२ मध्ये इंग्लंडने सलग दोन विजय नोंदवून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघही मजबूत स्थितीत आहे. जर न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव केला, तर श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचे आव्हान सुपर-८ मध्येच संपुष्टात येईल. अशा स्थितीत ५१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरीच्या 'लाइनअप'मध्ये एकही आशियाई संघ नसेल.

यापूर्वी आयसीसीच्या 'व्हाइट-बॉल' स्पर्धेत केवळ २००६ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अशी वेळ आली होती, जेव्हा हे तिन्ही संघ साखळी फेरीतच गारद झाले होते. आता सर्वांचे लक्ष सुपर-८ मधील उर्वरित सामन्यांकडे लागले आहे. आशियाई संघ जोरदार पुनरागमन करून आपला इतिहास राखणार की २०२६ चा विश्वचषक एका अनपेक्षित विक्रमाची नोंद करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT