स्पोर्ट्स

ENG vs NZ : इंग्लंडचा दिमाखदार विजय, किवींचे पंख छाटले! जॅक्स-रेहानची मॅच विनिंग खेळी

T20 World Cup 2026 : विल जॅक्स स्पर्धेत चौथ्यांदा सामनावीर पुरस्काराचा मानकरी

रणजित गायकवाड

कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ च्या 'सुपर-८' फेरीतील थरारक लढतीत इंग्लंडने न्यूझीलंडचा ४ विकेट्स आणि ३ चेंडू राखून पराभव केला. आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात फिरकीपटूंच्या फिरकीनंतर विल जॅक्स आणि रेहान अहमद यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडचे आव्हान धुळीस मिळवले.

न्यूझीलंडची संथ सुरुवात, इंग्लिश फिरकीचा विळखा

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय इंग्लंडच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. सलामीवीर टिम सेफर्ट (३५) आणि फिन ॲलन (२९) यांनी आक्रमक सुरुवात केली खरी, पण मधल्या फळीतील फलंदाजांना इंग्लंडच्या फिरकीसमोर नांग्या टाकाव्या लागल्या. इंग्लंडच्या विल जॅक्स (२/२३), आदिल रशीद (२/२८) आणि रेहान अहमद (२/२८) या त्रिकुटाने किवी फलंदाजांना ठराविक अंतराने बाद करून धावगतीवर अंकुश ठेवला. न्यूझीलंडला २० षटकांत ७ बाद १५९ धावांपर्यंतच मजल मारता आली.

'जॅक्स-अहमद'चा काउंटर अटॅक

१६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार जोस बटलर (०) आणि फिल सॉल्ट (२) स्वस्तात परतल्याने इंग्लंडची अवस्था २ बाद २ अशी बिकट झाली होती. हॅरी ब्रूक (२६), टॉम बँटन (३३) आणि सॅम करन (२४) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण राचिन रवींद्रने ३ बळी घेत सामन्यात रंगत आणली. इंग्लंडचा संघ ११७ वर ६ बाद अशा संकटात असताना मैदानात विल जॅक्स आणि रेहान अहमदची जोडी जमली.

१९ चेंडूत ४४ धावांची वादळी भागीदारी

सामना हातातून निसटतोय असे वाटत असताना विल जॅक्सने १८ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ३२ धावा कुटल्या. त्याला साथ देत रेहान अहमदने केवळ ७ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद १९ धावांची आक्रमक खेळी केली. या दोघांनी केवळ १६ चेंडूत ४४ धावांची अभेद्य भागीदारी करत ३ चेंडू राखून इंग्लंडला विजय मिळवून दिला.

थोडक्यात धावफलक:

  • न्यूझीलंड : १५९/७ (२० षटके) - ग्लेन फिलिप्स ३९, टिम सेफर्ट ३५; विल जॅक्स २/२३, आदिल रशीद २/२८.

  • इंग्लंड : १६१/६ (१९.३ षटके) - टॉम बँटन ३३, विल जॅक्स ३२*, रेहान अहमद १९*; राचिन रवींद्र ३/१९.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT