टी-२० विश्वचषकातील सुपर-८ फेरीच्या थरारक सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा २ गडी राखून निसटता पराभव केला. या रोमहर्षक विजयासह इंग्लंड स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला आहे.
शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात इंग्लिश कर्णधार हॅरी ब्रूकच्या झंझावाती फलंदाजीने इंग्लंडला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. श्रीलंकेच्या पाल्लेकेले स्टेडियमवर झालेल्या या अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानने विजयासाठी दिलेले १६५ धावांचे आव्हान इंग्लंडने १९.१ षटकात ८ गड्यांच्या बदल्यात पूर्ण केले.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा पाकिस्तानचा निर्णय सुरुवातीला फसला. सलामीवीर सैम अयुब (७) स्वस्तात बाद झाला, तर कर्णधार सलमान आगा (५) आणि अनुभवी बाबर आझम (२५) मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले.
एका बाजूने गडी बाद होत असताना शाहिजादा फरहानने ४५ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६३ धावांची खेळी केली. त्यानंतर फखर जमान (२५) आणि शेवटच्या षटकात शादाब खानने (२३) केलेल्या फटकेबाजीमुळे पाकिस्तानने ९ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून जेमी ओव्हरटन आणि लियाम डॉसन यांनी प्रत्येकी ३ बळी घेत पाकिस्तानच्या धावगतीला लगाम घातला.
१६५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टला बाद करून इंग्लंडला धक्का दिला. त्यानंतर जोस बटलर (२३) आणि जॅकोब बेथेल (८) यांनाही त्याने स्वस्तात तंबूत धाडले. ५ षटकांच्या आत इंग्लंडची अवस्था ३ बाद ३५ अशी झाली होती. शाहीनने आपल्या ४ षटकात ३० धावा देऊन ४ महत्त्वाचे बळी टिपले आणि सामन्यात रंगत निर्माण केली.
अशा कठीण प्रसंगी कर्णधार हॅरी ब्रूक मैदानात उतरला आणि त्याने सामन्याचे चित्र पालटले. ब्रूकने अवघ्या ५१ चेंडूत ५ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांसह १०० धावांची अविस्मरणीय शतकी खेळी केली. त्याने सॅम करन (१६) आणि विल जॅक्स (२८) सोबत महत्त्वपूर्ण भागीदारी करत इंग्लंडला विजयाच्या समीप नेले. मात्र, ब्रूक बाद झाल्यानंतर आणि जेमी ओव्हरटन शून्यावर यष्टीचीत झाल्यावर सामना पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बाजूने झुकला असे वाटले.
शेवटच्या काही चेंडूंमध्ये इंग्लंडला विजयासाठी धावांची गरज असताना लियाम डॉसन (११ नाबाद) आणि जोफ्रा आर्चर (५ नाबाद) यांनी संयम राखला. १९ व्या षटकात रंगत वाढली होती, मात्र १९.१ षटकात सलमान मिर्झाच्या चेंडूवर आर्चरने चौकार मारून इंग्लंडने विजय साजरा केला. पाकिस्तानच्या उस्मान तारिक आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी २ बळी घेतले, पण ते संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.