स्पोर्ट्स

ENG vs SL : इंग्लंडच्या ‘फिरकी’कडून लंकादहन! ५१ धावांनी विजय मिळवत ब्रिटिशांचा 'सुपर-८' मध्ये डंका

T20 World Cup 2026 : पल्लेकेले येथील सामन्यात यजमान श्रीलंकेचा पराभव

रणजित गायकवाड

पल्लेकेले : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या 'सुपर-८' फेरीतील एका अत्यंत चुरशीच्या आणि नाट्यमय सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा ५१ धावांनी धुव्वा उडवला. धावसंख्येच्या दृष्टीने हा सामना जरी 'लो स्कोअरिंग' वाटत असला, तरी इंग्लंडच्या गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी लोटांगण घातले.

फिल सॉल्टची एकाकी झुंज; इंग्लंडचे आव्हानात्मक पुनरागमन

नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार जोस बटलर अवघ्या ७ धावांवर बाद झाला, तर बेथेल आणि बॅन्टन स्वस्तात परतले. मात्र, सलामीवीर फिल सॉल्टने एका बाजूने खिंड लढवली. सॉल्टने ४० चेंडूंत ६२ धावांची (६ चौकार, २ षटकार) झंझावाती खेळी करत इंग्लंडला सावरले.

मधल्या फळीत हॅरी ब्रूक (१४), सॅम करन (११) आणि विल जॅक्स (२१) यांनी छोटेखानी योगदान दिले. लंकेच्या फिरकी गोलंदाजांनी, विशेषतः दुनिथ वेल्लालागे (३ बळी) आणि महीश तीक्ष्णा (२ बळी) यांनी इंग्लंडला जखडून ठेवले. निर्धारित २० षटकांत इंग्लंडने ९ बाद १४६ धावांपर्यंत मजल मारली.

श्रीलंकेची फलंदाजी पत्त्यांसारखी कोसळली

१४७ धावांचे लक्ष्य श्रीलंकेसाठी फारसे कठीण नव्हते, मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच लंकेच्या फलंदाजांवर टाच आणली. जोफ्रा आर्चरने सुरुवातीलाच पथुम निसांकाला बाद करून धडाका लावला. त्यानंतर सुरू झाला तो विल जॅक्स आणि लियाम डॉसन यांचा फिरकीचा करिष्मा.

श्रीलंकेचे फलंदाज एकामागून एक तंबूत परतले. कर्णधार दासुन शनाका (३०) आणि कामिंदू मेंडिस (१३) यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. संपूर्ण श्रीलंका संघ १६.४ षटकांत अवघ्या ९५ धावांवर गारद झाला.

इंग्लंडच्या गोलंदाजीची धार

इंग्लंडच्या विजयाचे खरे शिल्पकार ठरले त्यांचे फिरकीपटू. विल जॅक्सने केवळ २२ धावांत ३ महत्त्वपूर्ण बळी टिपले. त्याला लियाम डॉसन (२ बळी) आणि अनुभवी आदिल रशीद (२ बळी) यांनी मोलाची साथ दिली. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने ३ षटकांत अवघ्या २० धावा देत २ बळी मिळवून विजयाची पायाभरणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT