स्पोर्ट्स

T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलिया अडचणीत, स्पर्धेपूर्वीच संघाला मोठा झटका; ‘स्टार गोलंदाज’ स्पर्धेतून बाहेर

विश्वचषकाचा पहिला सामना सुरू होण्यास काही तास शिल्लक असतानाच ऑस्ट्रेलियाच्या गोटात चिंतेचे वातावरण

रणजित गायकवाड

सिडनी : टी-20 विश्वचषक स्पर्धेचा थरार शनिवारपासून (७ फेब्रुवारी) सुरू होत आहे. मात्र, या क्रिकेट महाकुंभाच्या सुरुवातीपूर्वीच ऑस्ट्रेलियन संघाला मोठा हादरा बसला आहे. संघाचा अनुभवी आणि दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (CA) याबाबत अधिकृतपणे माहिती दिली आहे.

दुखापतीमुळे स्वप्नभंग

विश्वचषकाचा पहिला सामना सुरू होण्यास काही तास शिल्लक असतानाच ऑस्ट्रेलियाच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. जोश हेजलवूड गेल्या काही काळापासून दुखापतीशी झुंज देत होता. तो सुपर-८ फेरीपर्यंत तंदुरुस्त होईल, अशी आशा निवड समितीला होती; परंतु त्याच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने अखेर त्याला स्पर्धेला मुकावे लागले आहे.

कमिन्सपाठोपाठ हेजलवूडही बाहेर; गोलंदाजी कमकुवत

ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वीच त्यांचा कसोटी कर्णधार आणि अव्वल वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स यानेही दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. आता हेजलवूडही बाहेर गेल्याने ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाजीची धार कमी झाली असून, संघाच्या आक्रमणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पर्यायी खेळाडूची घोषणा लवकरच

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अद्याप हेजलवूडच्या जागी अधिकृतपणे कोणत्याही खेळाडूचे नाव जाहीर केलेले नाही. ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना उशिराने असल्याने त्यांच्याकडे पुरेसा वेळ उपलब्ध आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राखीव खेळाडू म्हणून संघात असलेला सीन एबॉट याला मुख्य संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. एबॉट नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतही संघाचा भाग होता.

फिटनेसचे वाढते टेन्शन

केवळ हेजलवूडच नव्हे, तर ऑस्ट्रेलियन संघातील इतरही काही खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे समजते. आगामी फेरीत हे खेळाडू मैदानात उतरतील, अशी व्यवस्थापनाला आशा आहे. तथापि, दोन मुख्य गोलंदाज गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ या संकटातून कसा सावरतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT