Abhishek Sharma Pudhari
स्पोर्ट्स

IND vs ZIM : २६ चेंडूंत अर्धशतक ठोकूनही अभिषेक शर्माच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद

T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये अखेर भारतीय फलंदाज अभिषेक शर्माची बॅट तळपली

रणजित गायकवाड

चेन्नई : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये अखेर भारतीय फलंदाज अभिषेक शर्माची बॅट तळपली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या निर्णायक सामन्यात अभिषेकने २६ चेंडूंत झंझावाती अर्धशतक झळकावून सात डावांपासून सुरू असलेली धावांची प्रतीक्षा संपवली. चालू विश्वचषकातील हे त्याचे पहिलेच अर्धशतक ठरले. मात्र, या दिमाखदार कामगिरीनंतरही त्याच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.

७ डावांचा दुष्काळ संपला

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असलेल्या अभिषेक शर्माने ७ डावांच्या विश्रांतीनंतर 'फिफ्टी प्लस' धावसंख्या उभारली. यापूर्वी त्याने २५ जानेवारी २०२६ रोजी गुवाहाटी येथे न्यूझीलंडविरुद्ध शेवटचे अर्धशतक झळकावले होते. झिम्बाब्वेविरुद्धच्या या सामन्यात त्याने ३० चेंडूंत ५५ धावांची स्फोटक खेळी करत भारतीय डावाला भक्कम आधार दिला.

अभिषेकच्या नावावर 'नकोसा' विक्रम

अभिषेक शर्माने आपल्या पाचव्या डावात विश्वचषकातील पहिले अर्धशतक झळकावले. मात्र, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अभिषेकचे हे दुसरे सर्वात संथ अर्धशतक ठरले आहे. विशेष म्हणजे, त्याचे सर्वात संथ अर्धशतकही (३३ चेंडू) २०२४ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच हरारे येथे झाले होते.

विश्वचषकातील पुनरागमन

या विश्वचषकातील अभिषेकची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली होती. सलग तीन सामन्यांत त्याला शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने १५ धावा करत लयीत येण्याचा प्रयत्न केला, पण मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला होता. गुरुवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात मात्र ३ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांच्या मदतीने त्याने आपला जुना फॉर्म परत मिळवला आहे, जे भारतासाठी आगामी मोठ्या सामन्यांच्या दृष्टीने शुभसंकेत आहेत.

भारतीय संघात दोन मोठे बदल

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघ टीकेच्या भोवऱ्यात सापडला होता. उपांत्य फेरीचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला हरवणे भारतासाठी अनिवार्य आहे. या दबावाच्या परिस्थितीत संघात दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले. संजू सॅमसनला सलामीची संधी देण्यात आली. संजूने १५ चेंडूंत २४ धावा करत अभिषेकला चांगली साथ दिली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या इशान किशननेही २४ चेंडूंत ३८ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT