स्पोर्ट्स

ICC Mens T20 World Cup : अमेरिकेची धमाकेदार विजयी सलामी, कॅनडाला चिरडले

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Mens T20 World Cup : ॲरॉन जोन्स आणि अँड्रेस गौस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर अमेरिकेने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली. उद्घाटनच्या या सामन्यात यजमान संघाने त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी कॅनडाचा सात गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कॅनडाने 194 धावा केल्या. प्रत्युत्तरात अमेरिकेने 17.4 षटकात तीन विकेट्सच्या मोबदल्यात 197 धावा केल्या.

कॅनडाची दमदार फलंदाजी

डॅलस येथे खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कॅनडाने चांगली सुरुवात केली. सलामीवीर नवनीत धालीवालने 44 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 61 धावा केल्या. यानंतर निकोलस किर्टनने 31 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह 51 धावांची दमदार खेळी साकारली. या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर कॅनडाने 20 षटकांत 5 बाद 194 धावा केल्या.

अमेरिकेची खराब सुरुवात

195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्टीव्हन टेलरच्या रूपाने संघाने पहिली विकेट गमावली. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर कर्णधार मोनांक पटेल आणि अँड्रेस गौस यांनी दुसऱ्या विकेटसाठी 42 धावांची (37 चेंडू) भागीदारी केली. ही भागीदारी 7व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कर्णधार पटेलच्या विकेटने संपुष्टात आली. मोनांकने 16 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 16 धावा केल्या.

गौस-जोन्सची वादळी भागिदारी

यानंतर गौस आणि ॲरॉन जोन्स यांनी जबाबदारीने खेळत संघाचा डाव सावरला. दोघांनी संयमी आणि आक्रमक खेळी केली. ज्यामुळे प्रतिस्पर्धी कॅनडाच्या गोलंदाजांवर दबाब निर्माण झाला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी विक्रमी 131 धावांची (58 चेंडू) भागीदारी केली. ज्यामुळे सामन्याला कलाटणी मिळाली. ही शानदार भागीदारी 16व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर गौसच्या विकेटने संपुष्टात आली. गौसने 46 चेंडूंत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 65 धावांची खेळी केली.

विजयाच्या उंबरठ्यावर पोहचल्यानंतरही ॲरॉन जोन्सने कॅनेडियन गोलंदाजांवरील आक्रमणाची धार कमी केली नाही आणि एकामागून एक चेंडू सीमापार पाठवून विजयाला गवसणी घातली. जोन्सने अवघ्या 40 चेंडूत 10 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 94 धावा केल्या. चौथ्या विकेटसाठी त्याच्यात आणि कोरी अँडरसनमध्ये नाबाद 24* (12 चेंडू) धावांची भागीदारी झाली. अँडरसन 3 धावा करून नाबाद राहिला.

गेलच्या क्लबमध्ये सामील (ICC Mens T20 World Cup)

या सामन्यात 10 षटकार मारून जोन्स वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेलच्या क्लबमध्ये सामील झाला. टी-20 विश्वचषकाच्या एका डावात 10 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा तो दुसरा फलंदाज ठरला. ख्रिस गेलने दोनदा अशी कामगिरी केली आहे. 2007 मध्ये, त्याने टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 षटकार ठोकले होते. त्यानंतर, त्याने 2016 मध्ये आपलाच विक्रम मोडून इंग्लंडविरुद्ध 11 षटकार खेचले होते.

कॅनडाच्या गोलंदाजांना फटका

अमेरिकेच्या फलंदाजांनी कॅनडाच्या गोलंदाजांची धु धु धुलाई केली. कॅनडाकडून कलीम सना, डिलन हेलिगर आणि निखिल दत्ता यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. निखिल दत्ता संघासाठी सर्वात महागडा ठरला, त्याने 2.4 षटकात 15.40 च्या इकॉनॉमीमध्ये 41 धावा दिल्या. याशिवाय परगट सिंगने 1 षटकात 15 धावा दिल्या. जेरेमी गॉर्डनने 14.70 च्या इकॉनॉमीमध्ये 3 षटकात 44 धावा दिल्या आणि कर्णधार साद बिन जफरने 4 षटकात 10.50 च्या इकॉनॉमीमध्ये 42 धावा दिल्या.

कोहलीला टाकले मागे

टी-20 विश्वचषकात लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा फटकावणारा ॲरॉन जोन्स नॉन हा ओपनर बॅट्समन ठरला. ओपनिंगला न येता टी-20 वर्ल्ड कपमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या जस्टिन केम्पच्या नावावर होता. 2007 मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध नाबाद नाबाद 89 धावा केल्या होत्या. विराट कोहलीने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 82 आणि 2022 मध्ये पाकिस्तानविरुद्ध नाबाद 82 धावा केल्या होत्या.

टी-20 विश्वचषकात धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारे नॉन हा ओपनर फलंदाज

नाबाद 94 धावा : ॲरॉन जोन्स विरुद्ध कॅनडा, 2024
नाबाद 89 धावा : जस्टिन केम्प विरुद्ध न्यूझीलंड, 2007
नाबाद 85 धावा : मार्लन सॅम्युअल्स विरुद्ध इंग्लंड, 2016
83 धावा : जो रूट विरुद्ध भारत, 2016
नाबाद 82 धावा : लेंडल सिमन्स विरुद्ध भारत, 2016
नाबाद 82 धावा : विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2016
नाबाद 82 धावा : विराट कोहली विरुद्ध पाकिस्तान, 2022

या विजयासह अमेरिकेने अ गटात पहिले स्थान पटकावले आहे. या गटात त्यांचे पुढील सामने हे भारत, पाकिस्तान, आयर्लंड या संघाविरुद्ध होणार आहेत.

SCROLL FOR NEXT