विजयानंतर न्युझीलंडच्या खेळाडूंनी जल्लोष केला twitter
स्पोर्ट्स

India vs New Zealand | पहिल्याच लढतीत भारताचा का झाला पराभव?

पुढारी वृत्तसेवा

शारजाह : महिला टी-20 वर्ल्डकप 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेत भारतीय संघाला सलामीच्या लढतीतच पराभवाचा हादरा बसला आहे. दुबईत झालेल्या आपल्या पहिल्या लढतीत भारताला न्यूझीलंडकडून (India vs New Zealand) 58 धावांनी पराभूत व्हावे लागले. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 160 धावा केल्या, पण याला प्रत्युत्तर देणारा भारताचा डाव गडगडला. हरमनप्रीत कौरच्या 15 धावा या भारतीय बॅटरच्या सर्वोच्च धावा होत्या.

India vs New Zealand : न्युझीलंडच्या विजयात गोलंजदाजांचा मोलाचा वाटा

या सामन्यात भारतासमोर न्यूझीलंड संघाने 161 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी कोलमडली. भारतीय संघ 19 षटकात 102 धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाईन आणि गोलंदाजांनी या विजयात मोलाचा वाटा उचलला.

भारताकडून स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा सलामीला फलंदाजीसाठी उतरल्या होत्या, पण दुसर्‍याच षटकात भारताला पहिला धक्का बसला. शेफालीला इडेन कार्सनने आपल्याच गोलंदाजीवर झेल घेत 2 धावांवर बाद केले.

त्यानंतर मानधनाही पाचव्या षटकात 12 धावा करून कार्सनच्याविरुद्धच मॅडी ग्रीनकडे झेल देत बाद झाली. त्यानंतर हरमनप्रीत आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण चांगल्या सुरुवातीचा फायदा त्यांना घेता आला नाही. हरमनप्रीत 14 चेंडूंत 15 धावा करून रोझमेरी मेअरविरुद्ध खेळताना पायचित झाली.

पाठोपाठ ली ताहुहूने जेमिमाहला 13 धावांवर माघारी धाडले. मधल्या षटकात ताहुहूची शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली. तिने ऋचा घोषलाही फार वेळ टिकू दिले नाही. तिला 12 धावांवर 11 व्या षटकात बाद केले.

तर ताहुहूने दीप्ती शर्मालाही 13 धावांवर 15 व्या षटकात बाद करत भारताला मोठा धक्का दिला. दीप्ती बाद झाल्यानंतर भारताच्या आशाही जवळपास संपुष्टात आल्या होत्या. तरी भारतीय संघाला लक्ष्याच्या जवळ घेऊन जाण्याची तळातल्या फलंदाजांनी प्रयत्न केला, पण पूजा वस्त्राकरला 8 धावांवर एमेलिया केरने बाद केले.

त्यानंतर रोझमेरी मेअरने श्रेयंका पाटीलला 7 धावांवर आणि रेणुका सिंग ठाकूरला शून्यावरच बाद केले. त्यामुळे भारताचा डाव 102 धावांवरच संपला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडने 20 षटकांत 4 बाद 160 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून सलामीला आलेल्या सुझी बेटस् आणि जॉर्जिया प्लिमर यांनी चांगली सुरुवात दिली.

बेटस्ने 27 धावा केल्या, तर प्लिमरने 34 धावा केल्या. या दोघी बाद झाल्यानंतर कर्णधार सोफी डिवाईनने आधी एमेलिया केर आणि मग ब्रुक हालीडे यांना साथीला घेत न्यूझीलंडला 160 धावांपर्यंत पोहोचवले. डिवाईनने नाबाद 57 धावांची खेळी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT