द. आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा 3 विकेट्सने पराभव केला.  
स्पोर्ट्स

T20 World Cup: द. आफ्रिका सुसाट! वर्ल्डकपमध्ये ऐतिहासिक ‘अजिंक्य’ विक्रम

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup : पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने वेस्ट इंडिजचा 3 विकेट्सने पराभव केला आहे. द. आफ्रिकेने शेवटच्या षटकापर्यंत विजयासाठी संघर्ष केला आणि त्यात ते यशस्वीही झाले. हा सामना जिंकून आफ्रिकन संघाने उपांत्य फेरीतील आपला प्रवेश पक्का केला आहे. द. आफ्रिकेने 10 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पावसामुळे द. आफ्रिकेला 17 षटकांत 123 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी फलंदाजांच्या छोट्या खेळीमुळे संघाने गाठले.

10 वर्षांनी गाठली उपांत्य फेरी

  • द. आफ्रिकेने टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.

  • त्यांनी तब्बल 10 वर्षांनी टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

  • सोमवारी (दि. 24) त्यांनी वेस्ट इंडिजचा पराभव केला.

  • मार्करमच्या नेतृत्वाखाली हा संघ पहिले विजेतेपद पटकावेल का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

द. आफ्रिकेची चमकदार कामगिरी

द. आफ्रिकेचा संघ 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे. संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. त्यांनी सलग 7 सामन्यांमध्ये विरोधी संघांना पराभूत केले आहे. टी20 विश्वचषकाच्या 18 वर्षांच्या इतिहासात आफ्रिका हा पहिला संघ आहे ज्यांनी एकाच आवृत्तीत 7 सामने जिंकले आहेत. द. आफ्रिकेपूर्वी या टी-20 विश्वचषकात कोणत्याही संघाला सलग 7 सामने जिंकता आले नव्हते. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांनी टी-20 विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत 6-6 सामने जिंकले आहेत. (T20 World Cup)

टी-20 विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक सामने जिंकणारे संघ

  • द. आफ्रिका : 7 सामने, 2024

  • श्रीलंका : 6 सामने, 2009

  • ऑस्ट्रेलिया : 6 सामने, 2010

  • ऑस्ट्रेलिया : 6 सामने, 2021

तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक

द. आफ्रिका संघ 2007 पासून टी-20 विश्वचषक खेळत आहे. त्यांनी तिस-यांदा टी-20 विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. यापूर्वीच्या दोन उपांत्य फेरीतूनच त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. त्यांना अंतिम फेरी गाठता आली नव्हती. मात्र यंदाच्या स्पर्धेत या संघाने एडन मार्करमच्या नेतृत्वाखाली धडाकेबाज खेळ केला आहे आणि सलग 7 सामने जिंकून इतिहास रचला आहे. असे असले तरी हा संघ अंतिम फेरीत पोहचेल की नाही याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

टी-20 विश्वचषक 2024 मधील द. आफ्रिकेची कामगिरी

  • श्रीलंकेविरुद्ध 6 विकेटने विजय

  • नेदरलँड्सविरुद्ध 4 विकेट्सने विजय

  • बांगलादेशविरुद्ध 4 धावांनी विजय

  • नेपाळविरुद्ध 1 धावेने विजय

  • अमेरिकेविरुद्ध 18 धावांनी विजय

  • इंग्लंडविरुद्ध 7 धावांनी विजय

  • वेस्ट इंडिजविरुद्ध 3 गडी राखून विजय

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT