पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC T20 Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी नवीन क्रमवारी जाहीर केली. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी मजल मारली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात सॅमसनने झंझावाती शतक झळकावले आहे. मात्र दुस-या सामन्यात तो खातेही न उघडता शून्यावर बाद झाला. असे असले तरी तो 27 स्थानांनी झेप घेत 39व्या स्थानावर पोहोचला आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड अजूनही 881 रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचे (803) मोठे नुकसान झाले आहे. तो आता दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडच्या फिल सॉल्टने नुकतेच शतक केले होते, त्याचा फायदा त्याला झाला. एका स्थानाची झेप घेत तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे 841 रेटिंग आहे.
पाकिस्तानचा बाबर आझम सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग 755 आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान 746 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडच्या जोस बटलरला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता 726 च्या रेटिंगसह 6 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. बटलरने तब्बल चार महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय सामन्यात पुनरागमन केले. त्याने दुसऱ्याच सामन्यात स्फोटक खेळी खेळली आणि वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले होते. यशस्वी जैस्वालला एका जागेचा फटका बसला आहे. तो आता 720 च्या रेटिंगसह 7 व्या क्रमांकावर गेला आहे.
श्रीलंकेच्या पथुम निसांकाने 672 रेटिंगसह आठवा क्रमांक कायम राखला आहे. ऑस्ट्रेलियाच्या जोश इंग्लिशला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता 652 च्या रेटिंगसह 9व्या क्रमांकावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन दीर्घ काळानंतर टॉप 10 मध्ये परतला आहे. तो 645 च्या रेटिंगसह 10 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. अफगाणिस्तानच्या रहमानउल्ला गुरबाजने 4 स्थानांची झेप घेतली आहे. तो 11व्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग 636 आहे. द. आफ्रिकेच्या रीझा हेंड्रिक्सने दोन स्थानांनी सुधारणा करून 12व्या स्थानावर पोहोचला आहे.