मुंबई : भारतीय टी-20 संघाचा विश्वविजेता कर्णधार सूर्यकुमार यादव आज मैदानात चौफेर फटकेबाजी करत असला, तरी त्याच्या या यशामागे बॅटपेक्षाही प्रभावी ठरला तो त्याच्या पत्नीने विचारलेला एक कळीचा प्रश्न. 2018 मध्ये पत्नी देविशाने विचारलेल्या एका साध्या पण बोचऱ्या प्रश्नाने सूर्याच्या कारकिर्दीला अशी काही कलाटणी दिली की, आज तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक बनला आहे.
एका पॉडकास्टमध्ये सूर्याने आपल्या प्रवासातील हा रंजक खुलासा केला. 2016 मध्ये लग्न झाले तेव्हा सूर्या ‘केकेआर’कडून खेळत होता. देविशाने त्याला विचारले, तुझ्या वयाचे अनेक खेळाडू टीम इंडियात खेळत आहेत, तुझे काय नियोजन आहे? सूर्या म्हणाला, मलाही भारतासाठी खेळायचे आहे. त्यावर देविशाने पुढचा गुगली टाकला- पण कसं खेळणार? हा प्रश्न सूर्याच्या मनाला लागला. तो म्हणाला, जर मला भारतासाठी खेळायचे असेल, तर नक्की काय वेगळे करावे लागेल, याचा मी विचार करू लागलो. त्यानंतर सूर्याने आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल केले. डाएटवर नियंत्रण मिळवले, मित्रांसोबतच्या पार्ट्या कमी केल्या आणि क्रिकेटकडे ‘मंडे टू फ्रायडे’ जॉबप्रमाणे गांभीर्याने पाहू लागला.
सूर्याच्या यशात देविशाचा वाटा मोठा आहे; पण ती त्याला क्रिकेटचे तांत्रिक सल्ले देत नाही. सूर्या सांगतो, तिने मला मैदानाबाहेर कसे वागायचे हे शिकवले. घरात शिरल्यावर मी ‘सूर्यकुमार यादव’ नसतो. अगदी स्वतःचे जेवणाचे ताट स्वतः सिंकमध्ये ठेवण्यासारख्या छोट्या गोष्टींतून तिने मला जमिनीवर राहण्यास शिकवले.