नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट क्षेत्रातून सध्या अत्यंत खळबळजनक वृत्त समोर येत आहे. भारताला आपल्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक जिंकून देणारा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याला टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून तडकाफडकी हटवण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर, फॉर्मशी झगडत असलेल्या सूर्याला आगामी मालिकांसाठी भारतीय संघात स्थान मिळणेही कठीण झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भविष्यातील विजन डोळ्यांसमोर ठेवून हा अत्यंत कठोर आणि मोठा निर्णय घेतला आहे.
या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आयर्लंड आणि इंग्लंडच्या आगामी दौऱ्यांपूर्वीच बीसीसीआयने हा मोठा निर्णय जाहीर केला असून, भारतीय संघ आता एका नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरण्यासाठी सज्ज होत आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'द इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, निवड समिती, बोर्ड आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
"सूर्यकुमार यादवच्या कप्तानीखाली संघाने टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद नक्कीच पटकावले. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली संघाने सलग आठ द्विपक्षीय मालिका आणि २०२५ चे आशिया चषक देखील जिंकले. परंतु, त्याचा सध्याचा फॉर्म आणि संघाचे भविष्य पाहता, आता पुढे जाण्याची आणि नवीन पर्याय शोधण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मॅनेजमेंटला वाटते. त्याला आगामी निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाही आणि या निर्णयाची कल्पना लवकरच सूर्याला दिली जाईल," असे या अधिकाऱ्याने सांगितले.
२०२४ मध्ये रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर, हार्दिक पांड्याला मागे टाकत सूर्यकुमार यादवकडे भारतीय टी-२० संघाची धुरा सोपवण्यात आली होती. त्यावेळी तो जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज होता. मात्र, कर्णधारपद आल्यानंतर त्याच्या फलंदाजीचा आलेख खालावला.
गेल्या काही काळापासून त्याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२६ च्या हंगामातही त्याचा फॉर्म अत्यंत चिंताजनक होता. या हंगामातील १३ सामन्यांत त्याला केवळ २७० धावा करता आल्या. हंगामातील शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याने अर्धशतक झळकावून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपूर्ण हंगामात तो धावांसाठी संघर्ष करतानाच दिसला. परिणामी, टी-२० फॉरमॅटमधील भारताच्या एका सर्वोत्तम फलंदाजाचा हा प्रवास आता थांबण्याच्या मार्गावर आहे.