स्पोर्ट्स

IPL 2024 : हैदराबाद एक्स्प्रेसची फायनलमध्ये धडक!

दिनेश चोरगे

 चेन्नई; वृत्तसंस्था : अर्धशतकवीर हेन्रिच क्लासेनसह (50) ट्रॅव्हिस हेड (34), राहुल त्रिपाठी (37) यांची आक्रमक फलंदाजी आणि शाहबाज अहमद (3-23), अभिषेक शर्मा (2-24) यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर हैदराबाद सनरायझर्सने येथील दुसर्‍या क्वालिफायर लढतीत राजस्थान रॉयल्सचा एकतर्फी धुव्वा उडवला आणि फायनलमध्ये जोरदार धडक मारली. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर हैदराबादने निर्धारित 20 षटकांत 9 बाद 175 धावांची मजल मारली, तर प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सला निर्धारित 20 षटकांत 7 बाद 139 धावांवर समाधान मानावे लागले.

विजयासाठी 176 धावांचे आव्हान असताना राजस्थानचा संघ एकदाही विजयाच्या ट्रॅकवर दिसून आला नाही. त्यांचे आघाडीचे व मध्यफळीतील फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत राहिले आणि यामुळे ते विजयापासून कित्येक कोस दूरच राहिले. सलामीवीर यशस्वी जैस्वाल (21 चेंडूत 4 चौकार, 3 षटकारांसह 42) व ध्रुव जुरेल (35 चेंडूंत नाबाद 56) यांचा थोडाफार प्रतिकार, हेच राजस्थानच्या डावाचे एकमेव वैशिष्ट्य ठरले.

टॉम कोहलर-कॅडमोर (10), संजू सॅमसन (10), रियान पराग (6), रविचंद्रन अश्विन (0), सिमरॉन हेटमायर (4), रोव्हमन पॉवेल (6) अतिशय स्वस्तात बाद झाल्यानंतर राजस्थानचा संघ बॅकफूटवर फेकला जाणार, हे जवळपास निश्चित होते. ध्रुव जुरेलने आक्रमक अर्धशतक झळकावत अगदी शेवटच्या षटकापर्यंत संघर्ष केला. मात्र, तोवर सनरायझर्स हैदराबादचा विजय ही निव्वळ औपचारिकता होती.

प्रारंभी, राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत हैदराबादला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि पहिल्या टप्यात राजस्थानच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांवर अंकुश ठेवला होता. अभिषेक शर्मा 12 धावांवर बाद झाल्याने हैदराबादला धक्का बसला. बोल्टच्या गोलंदाजीवर कव्हरवरील कॅडमोरने त्याचा अचूक झेल टिपला. राहुल त्रिपाठीने 37 धावांवर बाद होण्यापूर्वी हेडसह दुसर्‍या गड्यासाठी 42 धावा जोडल्या. बोल्टने डावातील पाचव्या षटकात त्रिपाठी व मारक्रम यांचे बळी घेत हैदराबादला बॅकफूटवर टाकले आणि याचा धावगतीवर विपरीत परिणाम झाला.

हेन्रिच क्लासेनच्या शानदार अर्धशतकामुळे पुढे हैदराबादला पावणेदोनशे धावांचा टप्पा गाठता आला. क्लासेनने 34 चेंडूत 50 धावांची खेळी साकारली. यात 4 उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला. शाहबाज अहमद वगळता अन्य फलंदाजांनी मात्र केवळ मैदानात हजेरी लावण्याचे काम केले. मारक्रम (1), नितीश रेड्डी (5), समद (0), उनादकट (5) एकेरी धावसंख्येवर बाद झाले, तर कमिन्स 5 धावांवर नाबाद राहिला. राजस्थानतर्फे ट्रेंट बोल्ट व आवेश खान यांनी प्रत्येकी 3, तर संदीप शर्माने 2 बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

सनरायझर्स हैदराबाद : 20 षटकांत 9 बाद 175. (ट्रॅव्हिस हेड 34, हेन्रिच क्लासेन 50. ट्रेन्ट बोल्ट 3/45, आवेश खान 3/27. )
राजस्थान रॉयल्स : 20 षटकांत 7 बाद 139. (यशस्वी जैस्वाल 42, ध्रुव ज्युरेल नाबाद 56. शाहबाज अहमद 3/23, अभिषेक शर्मा 2/24.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT