CSK vs SRH | हैदराबाद एक्स्प्रेस प्ले ऑफमध्ये! इशान किशन ठरला विजयाचा शिल्पकार 
स्पोर्ट्स

CSK vs SRH | हैदराबाद एक्स्प्रेस प्ले ऑफमध्ये! इशान किशन ठरला विजयाचा शिल्पकार

घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा धक्का

पुढारी वृत्तसेवा

चेन्नई; वृत्तसंस्था : पॅट कमिन्सचा भेदक मारा आणि इशान किशनच्या 47 चेंडूंतील 70 धावांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने येथील आयपीएल साखळी सामन्यात यजमान चेन्नईचा विजयाचा घास अक्षरश: हिसकावून घेतला आणि स्पर्धेच्या प्ले ऑफमधील आपले स्थान अगदी थाटात निश्चित केले. चेन्नईने या लढतीत 7 बाद 180 धावा केल्या तर हैदराबादने 19 षटकांतच 5 गड्यांच्या बदल्यात 181 धावांसह विजयावर शिक्कामोर्तब केले.

विजयासाठी 181 धावा आवश्यक असताना इशान किशनने 47 चेंडूंत 7 चौकार, 3 षटकारांसह सर्वाधिक 70 धावा केल्या. त्याला हेन्रिच क्लासेनने 26 चेंडूंत 47 धावांसह समयोचित साथ दिली. या जोडीने तिसर्‍या गड्यासाठी 75 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. नंतर इशान 19 व्या षटकात बाद झाला, त्यावेळी हैदराबादचा विजय, ही केवळ औपचारिकता होती.

चेन्नईची 180 धावांपर्यंत मजल

प्रारंभी, चेन्नई सुपर किंग्जने सर्वसमावेशक फलंदाजीच्या जोरावर 7 बाद 180 धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने 28 धावांत 3 बळी घेतले; परंतु चेन्नईच्या फलंदाजांनी सांघिक खेळावर भर देत पावणेदोनशे धावांचा टप्पा सहज पार केला. डेवाल्ड ब्रेविसने 27 चेंडूंत सर्वाधिक 44 तर कार्तिक शर्माने 19 चेंडूंत 32 धावांचे योगदान दिले.

तत्पूर्वी, संजू सॅमसनने चेन्नईला वादळी सुरुवात करून दिली. त्याने नितीश कुमार रेड्डीच्या पहिल्याच षटकात एक षटकार आणि दोन चौकार ठोकून 17 धावा वसूल केल्या. मात्र, हाच टेम्पो नंतर या संघाला पुढे कायम ठेवता आला नव्हता.

गुजरात टायटन्सचे प्ले ऑफमधील स्थानही निश्चित

हैदराबादने चेन्नईचा 5 गड्यांनी धुव्वा उडवल्यानंतर या निकालासह गुजरात टायटन्सचा संघही प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. आतापर्यंत आरसीबी, हैदराबाद व गुजरात अशा 3 संघांनी प्ले ऑफमध्ये धडक मारली असून उर्वरित एकमेव जागेसाठी पंजाब, राजस्थान, चेन्नई, दिल्ली व केकेआर अशा तब्बल 5 संघांत चुरस रंगणार आहे.

धोनी 13 व्या सामन्यातही मैदानावर नाहीच!

चेन्नईतील घरच्या मैदानावरील या लढतीसाठी धोनी संघासमवेत होता. शिवाय, त्याने कसून सरावही केला होता. त्यामुळे, येथे तो अंतिम एकादशमध्ये समाविष्ट असेल, अशी आशा होती. पण, प्रत्यक्षात चेन्नईच्या साखळीतील 14 पैकी या 13 व्या लढतीतही धोनी खेळलाच नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT