पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा कसोटी कर्णधार रोहित शर्माने ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात केलेला प्रयोग पूर्णपणे फसला. या सामन्यात तो ओपनिंगला येण्याऐवजी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. कारण, पर्थ कसोटीत केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी दुसऱ्या डावात भारतासाठी 201 धावांची विक्रमी सलामी दिली होती, ज्यामुळे भारताला विजय मिळण्यास खूप मदत झाली. परिणामी, रोहितने या जोडीशी छेडछाड करणे योग्य होणार नाही असे ठरवले.
हिटमॅनचा ॲडलेड कसोटीसाठीचा हा निर्णय योग्य ठरला नाही. सहाव्या क्रमांकावर येऊन त्याने पहिल्या डावात 3 धावा आणि दुसऱ्या डावात 6 धावा केल्या. रोहितच्या या फ्लॉप शोनंतर टीम इंडियाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी त्याला मोठा सल्ला दिला आहे. स्टार स्पोर्ट्स वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, ‘रोहितने गाबा कसोटीत भारतासाठी सलामीला यावे, कारण त्याला चेंडू बॅटवर येणे आवडते.’
गावस्कर म्हणाले, ‘मला वाटते रोहितने पुढील कसोटीत सलामीला यावे. पहिल्या कसोटीत यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांच्यात 201 धावांची भागीदारी केली होती. मात्र यानंतर मोठा गॅप आला आणि रोहितने मधल्या फळीत फलंदाजी केली. पुढच्या कसोटीत भारत चांगली फलंदाजी करेल असा माझा अंदाज आहे. अशा परिस्थितीत, रोहितने नवीन चेंडूने म्हणजेच सलामीला फलंदाजीस येण्याची गरज आहे. कारण तो त्याचा नैसर्गिक खेळ आहे. तर राहुल जेव्हा फलंदाजीला येईल तेव्हा तो दुसऱ्या नवीन चेंडूच्या वेळी मैदानात उतरेल अशी अपेक्षा आहे.’
वृत्तानुसार, ॲडलेड कसोटीपूर्वी रोहित शर्माने नवीन चेंडूने सराव केला नव्हता. पण तिसऱ्या कसोटीपूर्वी सराव सत्रादरम्यान तो नवीन चेंडूवर नेट्समध्ये खेळताना दिसला. यादरम्यान, त्याने जसप्रीत बुमराह, आकाशदीप, मोहम्मद सिराज यांच्या गोलंदाजीचा सामना केला. हिटमॅनने ज्या पद्धतीने सराव केला आहे, त्यावरून तो यशस्वीसोबत सलामीला येईल अशी दाट शक्यता आहे. असे झाल्यास केएल राहुल सहाव्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. रोहितने आता ऑस्ट्रेलियाच्या परिस्थितीशी जुळवून घेतलं आहे आणि त्याला आता कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.